महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जून । कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या प्रकारामुळे पुन्हा चिंता वाढली आहे. कोरोनाच्या इतर प्रकारांच्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’चा फुप्फुसांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता आहे, असा इशारा लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (एनटीएजीआय) अध्यक्ष डॉ. एन.के.अरोरा यांनी दिला. मात्र, ‘डेल्टा प्लस’मुळे अधिक गंभीर आजाराची शक्यता नसून तो कोरोनाच्या इतर प्रकारापेक्षा अधिक संसर्गजन्य नाही, असा दिलासाही त्यांनी दिला.
नुकतेच ११ जूनला कोरोनाच्या या नव्या प्रकाराची ओळख पटली असून हा प्रकार चिंताजनक असल्याचेही सांगितले जात आहे. देशभरातील १२ राज्यांत ‘डेल्टा प्लस’चे रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्याबद्दल बोलताना डॉ. अरोरा म्हणाले, की कोरोनाच्या इतर प्रकारांच्या तुलनेत ‘डेल्टा प्लस’चा फुप्फुसांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र, त्यामुळे, अधिक गंभीर आजाराची शक्यता नसून तो अधिक इतर प्रकारांपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे, असाही याचा अर्थ होत नाही. डेल्टा प्लसचा कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा फुप्फुसातील श्लेष्मल अस्तराला अधिक संसर्ग होऊ शकतो. मात्र, डेल्टा प्लसमुळे फुप्फुसावर नेमका किती परिणाम होतोय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचे आणखी रुग्ण आढळल्यानंतरच ते स्पष्ट होईल.
लक्षणे नसलेले रुग्ण अधिक असल्याने ‘डेल्टा प्लस’ची रुग्णसंख्या अधिक असू शकते. अशा व्यक्तींकडून त्याचा अधिक प्रसार होत आहे. मात्र, ‘डेल्टा प्लस’चे पुरेसे लवकर निदान झाले आहे. अनेक राज्यांकडून त्याचे रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांत सूक्ष्मनियोजन करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे, या जिल्ह्यांत लसीकरणही वाढविले जाईल. कोरोनाच्या लाटा त्याच्या नव्या प्रकाराशी संबंधित असल्या तरी ‘डेल्टा प्लसमुळे तिसरी लाट येईल का, हे सांगणे अवघड आहे, असेही डॉ. अरोरांनी स्पष्ट केले.