छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपतर्फे राज्यसभेवर वर्णी लागणार

Spread the love

महाराष्ट्र २४ – छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री. छ. उदयनराजे भोसले यांची भाजपतर्फे राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने दि. 2 एप्रिल रोजी उदयनराजे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

राज्यसभेच्या 7 सदस्यांची मुदत लवकरच संपत आहे. त्यामध्ये भाजपतर्फे खा. अमर साबळे व भाजप पुरस्कृत खा. रामदास आठवले यांचा समावेश आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याने पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा प्रभाव वाढण्यासाठी उदयनराजेंना संधी देण्याचा आग्रह भाजपमधून केला जात होता. याच प्रक्रियेचा भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली.

या बैठकीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्वत: श्री. छ. उदयनराजे भोसले, सुधीर मुनगंटीवार, धनंजय महाडिक उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीवर यावेळी बरीच खलबते झाले. बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या उमेदवारीचा आग्रह धरला. त्यानुसार भाजपतर्फे त्यांची उमेदवारीही निश्चित केली गेल्याची माहितीही सूत्रांनी दिली. उदयनराजेंच्या राज्यसभेवर जाण्याने भाजपला फायदा होणार असल्याने केंद्रीय नेत्यांना सांगण्यात आले. दि. 2 एप्रिल रोजी उदयनराजे राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतील, अशी शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. उदयनराजेंची राज्यसभा निश्चित झाल्याच्या वृत्ताने सातार्‍यातील राजे समर्थकांमध्ये समाधानाची लहर पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *