महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ जुलै । गेली चार दिवसांपासून पंढरपूर आषाढी पायी वारीला परवानगी द्यावी या मागणीसाठी व वारी करणारच असा आग्रह धरून बंडातात्या कराडकर व वारकर्यांनी आंदोलन सुरू केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी तात्यांनी आळंदी येथे पोहोचून पायी वारीला सुरुवात केली होती. परंतु पोलिसांनी शनिवारी सकाळी आळंदी जवळील तापकिरवाडी येथून बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कराड तालुक्यातील करवडी येथील श्रीकृष्ण गोपालन केंद्रामध्ये आणून स्थानबद्ध केले.
दरम्यान याबाबत पत्रकारांशी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी सांगितले की, पंढरपूर आषाढी पायीवारी व्हावी यासाठी आमचा आग्रह होता. याच मागणीसाठी चार दिवसांपासून आमचे शांतता व संयमाच्या मार्गाने आणि वारकरी संप्रदायाच्या चाकोरीत राहून आंदोलन सुरू होते. परंतु पोलिसांनी वारकर्यांचे हे आंदोलन आपल्या खाक्याप्रमाणे निपटून काढण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला.
त्यानंतर पोलिसांनी पांडुरंग तात्या घुले व मला स्थानबद्ध केले आहे. आषाढी वारी व कोरोनाचा विचार करता वारकऱ्यांचे आक्रमक आंदोलन न करता पोलिसांचा निर्णय आम्ही मान्य केला आहे. समस्त वारकऱ्यांचा विचार करून आम्ही सध्या वारकऱ्यांना शांततेचे आवाहन करत आहे. याबाबत नंतर आंदोलन केले जाईल. परंतु आता वारकऱ्यांनी संयम ठेवावा, असेही बंडातात्या कराडकर यांनी सांगितले.