महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । केंद्रीय मंत्रिमंडळातील मोठे फेरबदल आणि विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी बहुतांश मंत्र्यांनी पदाभार स्वीकारला. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची पहिली बैठक पार पडली. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रणाच्या तयारीसाठी २३,१२३ कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर झाले. दुसरीकडे, एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत निधी योजनेत दुरुस्ती करून या निधीचा वापर कृषी उत्पन्न बाजार समित्या बळकट करण्यासाठी केला जाईल. कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना वायफळ वक्तव्ये टाळणे, वेळेवर मंत्रालयात पोहोचणे आणि मीडियात चमकोगिरीचा उपद्व्याप करण्याऐवजी सर्व ऊर्जा कामात ओतण्याचा सल्ला दिला. सूत्रांनुसार, काही मंत्र्यांना हटवण्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “जे आता मंत्रिमंडळात नाहीत, त्यांचेही खूप मोठे योगदान आहे. व्यवस्थेमुळे त्यांना हटवले आहे, क्षमतेमुळे नव्हे. नव्या मंत्र्यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला पाहिजे. गरजूंच्या मदतीकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. काम करणे हेच सर्वतोपरी आहे.’
सर्व मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच थांबण्याचे निर्देश
पावसाळी अधिवेशनामुळे मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीत थांबणे, खासदारांच्या भेटीच्या वेळा ठरवण्यास सांिगतले आहे. दुसरीकडे, पर्यटनस्थळी गर्दीबद्दल चिंता व्यक्त करत माेदी म्हणाले, महामारीचा धोका अद्याप टळलेला नाही.