महागाईचा रौद्रावतार ; राज्याचे सर्व भाग महागाईच्या वणव्यात होरपळले

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । चढ्या इंधन दरामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने मुंबई, ठाणे, कोकणासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्याचे सर्व भाग महागाईच्या वणव्यात होरपळले आहेत. भाज्या, फळे, डाळी आणि दुधाचे दर वधारल्याने सामान्यांच्या घरखर्चात वाढ झाली आहे. मालवाहतूकदारांनी भाडेवाढ केल्याने घाऊक तसेच किरकोळ बाजारात अन्नधान्याच्या दरांमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इंधनाचे वाढते दर आणि टाळेबंदीतील निर्बंधांचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसराला होणारी जीवनावश्यक वस्तूंची आवक स्थिर असतानाही किरकोळ बाजारात जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. डाळींच्या दरांतही किलोमागे १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात स्थिर असले तरी इंधन दरवाढीचे कारण पुढे करत किरकोळ बाजारात ग्राहकांची अक्षरश: लूट सुरू आहे. मुंबई महानगर परिसरातील भाजी बाजार दुपारी ४ नंतर बंद होत असल्याने त्याआधी काही भाज्या चढ्या दराने विकल्या जात आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. परिणामी पुणे, नाशिक, सातारा जिल्ह्यांतून मुंबईत येणाऱ्या शेतमालाचे दर वाढू लागले आहेत. मुंबई महानगर परिसरास प्रामुख्याने नाशिक तसेच पुणे जिल्ह्यातून भाजीपाल्याचा पुरवठा होतो.

वाहतूक खर्च वाढल्याने घाऊक बाजारात भाज्यांचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी किरकोळ विक्रेते इंधन दरवाढ आणि टाळेबंदीच्या नावाखाली भाज्यांची दुप्पट दराने विक्री करत आहेत. करोनाची संभाव्य तिसरी लाट आणि करोनाच्या उत्परिवर्तित प्रकाराच्या भीतीमुळे राज्यात २८ जूनपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. त्यानुसार अत्यावश्यक वस्तूंची दुकाने तसेच बाजारपेठा सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार विक्रीचा कालावधी कमी झाल्याने किरकोळ व्यापाऱ्यांनी वस्तूंच्या किमतींत आणखी वाढ केल्याचे आढळते.

मुंबई महानगर क्षेत्रात किरकोळ बाजारात भेंडी (६०-८० रुपये किलो), कांदा (३५ ते ४०), फ्लावर (४० ते ६० रुपये), गवार (८० ते १०० रुपये), कारली (६० ते ८० रुपये) अशा प्रमुख भाज्यांची विक्री अवाच्या सवा दराने होत आहे. घाऊक बाजारात २२ रुपये प्रति किलोने विकला जाणारा दुधी भोपळा किरकोळ बाजारात ४० ते ६० रुपयांनी विकला जात आहे. घाऊक बाजारात ११० रुपये प्रति किलोने विकली जाणारी फरसबी किरकोळ बाजारात १२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. घाऊक बाजारात १२० रुपये किलो असलेला मटार किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपयांनी विकला जात आहे.

गेल्या पंधरवड्यापासून डाळींच्या दरांतही मोठी वाढ झाली आहे. डाळींच्या दरात वाहतूक खर्चाची बाजू नेहमीच महत्त्वाची मानली जाते. इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याने डाळींचे घाऊक आणि किरकोळ दर वाढले असून तूर, मसूर, मूग डाळींचे दर १२० ते १४० रुपयांवर गेले आहेत.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांसह खरेदीदारांना थेट झळ पोहोचली आहे. किरकोळ बाजारात अन्नधान्याच्या दरात वाढ झाली असून डाळी, साखर, तेलाचे दर तेजीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्याने शेतमाल वाहतूकदारांनी भाडेआकारणीत वाढ केल्याने त्याची परिणती किरकोळ बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीत झाली आहे. गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर तसेच परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची आवक होते. घाऊक बाजारात शेतमाल पाठविणाऱ्या शेतक ऱ्यांकडून वाहतूकदार वाढीव दराने भाडेआकारणी करत आहेत. त्यामुळे त्याची झळ शेतक ऱ्यांना सोसावी लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Facebook
  • X (Twitter)
  • LinkedIn
  • Mix
  • More Networks
Copy link