Weather Alert: कोकणात पावसाचा जोर कायम; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ जुलै । रविवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणांना पावसानं (Rain) झोडपून काढलं आहे. तर धुळे, सातारा, सोलापूर, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत देखील मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळल्या आहे. आज पुन्हा राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता भारतीय हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. पुढील चोवीस तासात दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सध्या मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूननं (Monsoon) चांगला जोर पकडला आहे. सक्रिय झालेल्या मान्सूनमुळे पुढील तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांशी भागात अतिवृष्टी (Very Heavy rain) होण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर आज दक्षिण कोकणात आणि गोव्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.

त्यासोबतच आज सातारा, कोल्हापूर आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आकाशात विजांचा गडगडाट होत असताना, घराबाहेर पडून नये अथवा मोठ्या झाडाच्या आडोशाला उभा राहू नये, असा सल्ला हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

आज पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांशी जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणे, अहमदनगर, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यासह मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज कोरडं हवामान असण्याची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *