रामलीला मैदानात अरविंद केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Spread the love

महाराष्ट्र २४- नवी दिल्ली; आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रामलीला मैदानात हा सोहळा पार पडला. केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, कैलाश गेहलोत, इमरान हुसेन यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. मनिष सिसोदिया यांनी मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री काम पाहिले आहे.

दिल्लीत आम आदमीच्या भरवशावर सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षाच्या शपथविधी सोहळ्यात नेहमीप्रमाणे सर्वसामान्य मान्यवर आकर्षणाचे केंद्र ठरले. आज रामलीला मैदानावर झालेल्या सोहळ्यासाठी भव्य मंच उभारला होता. मंचावर अरविंद केजरीवाल, त्यांचे मंत्रिमंडळ यांच्यासमवेत दिल्लीच्या सरकारी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी तसेच शिपायांसह सर्वसामान्य हजर होते. शहिदांच्या कुटुंबीयांनाही सोहळ्याचे विशेष निमंत्रण देण्यात आले होते. यासोबतच दिल्लीच्या विकासात मोलाचा वाटा असलेल्या नानाविध क्षेत्रांतील मान्यवरांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

विकासाच्या केजरीवाल मॉडेलला दिल्लीकरांनी विजयी केले. भ्रष्टाचारमुक्त सरकार इच्छिणार्‍या प्रत्येकाचा विजय झाला आहे. सर्वसामान्य दिल्लीकरच त्यामुळे शपथविधी सोहळ्याचे विशेष पाहुणे असतील, अशी माहिती ‘आप’ नेते मनीष सिसोदिया यांनी शनिवारी पत्रकार परिषदेतून दिले. शहिदांच्या कुटुंबीयांसह दिल्लीतील उद्योगपती, व्यापारी, दुकानदार, वकील, पत्रकार, विद्यार्थी, बस-ऑटो चालक, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडूंना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर सोहळ्यात सहभागी झाले होते. शपथविधीच्या मंचावर जवळपास ५० पाहुणे होते. सरकारी शाळेतील शिक्षक, नोकर, ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थी तसेच दिल्लीच्या उभारणीत योगदान असलेल्या मान्यवरांचा त्यात सहभाग होता. ‘मुख्यमंत्री जय भीम योजने’तील लाभार्थी विद्यार्थी ही सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मोहल्ला क्लिनिकचे डॉक्टर, तसेच बाईक रुग्णवाहिका आकर्षणाचे केंद्र राहिले.

यांनाही विशेष आमंत्रण  मुख्यमंत्री फरिश्ते योजनेअंतर्गत नागरिकांचे प्राण वाचवणार्‍यांनाही सोहळ्यात आमंत्रित करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, पोलिस कर्मचार्‍यांचे कुटुंबीय, सफाई कर्मचारी, बस मार्शल, मेट्रो चालक, दिल्लीत जागतिक दर्जाचा सिग्नेचर ब्रिज बनवणारे स्थापत्यशास्त्रज्ञ, बांधकाम करणारे मजूर, अंगणवाडी सेविका, घरपोच शिधा पोहोचवणार्‍या प्रतिनिधींना सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

अण्णा हजारेंना निमंत्रण नाही २०१३ मध्ये पहिल्यांदा अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आमंत्रित केले होते. प्रकृतीचे कारण पुढे करीत अण्णा हजारेंनी सोहळ्यात उपस्थित राहणे टाळले होते. यंदा शपथविधी सोहळ्यासाठी अण्णांना निमंत्रित करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. केजरीवालांना त्यांच्या गुरूंचा विसर पडल्याची चर्चा त्यामुळे राजकीय वर्तुळात रंगली होती.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *