महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Coronavirus Cases in India) घट होत असतानाच लोक मोठ्या संख्येने बाजारपेठांकडे वळत आहेत, सार्वजनिक व पर्यटनस्थळांकडे जात आहेत. सोबतच कोरोनापासून बचावासाठीच्या नियमांचं (Covid-19 Norms) पालन करीत नाहीत. यावरच आता तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं, की कोरोनाचा प्रसार (Spread of Coronavirus) रोखण्यासाठी समाजाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही. मात्र, लोकांना समोरचा धोकाच दिसत नाहीये.
तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की जनतेच्या वागण्यात आलेल्या बदलांमध्ये सरकारवर त्यांचा असलेला विश्वास महत्त्वाचा असतो. मात्र, आपलं दुर्भाग्य म्हणजे लोकांचा राजकीय पक्षांवर विश्वास कमी आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे, की कोरोना प्रसाराची गंभीरता आणि लसीकरणाचा दर याबाबत स्पष्ट माहिती दिली जात नसल्यानंही ही स्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर पर्यटनस्थळांवरील काही फोटो समोर येत आहेत, यात गाड्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. यामुळे चिंता आणखीच वाढली आहे. आपलं आयुष्य पुन्हा एकदा मार्गावर आणण्यासाठी लोकांनी कोरोनाच्या नियमांचंही सर्रास उल्लंघन केलं आहे.
वरिष्ठ महामारी विशेषतज्ञ ललितकांत म्हणाले, की नियमांचं पालन न करण्याचं कारण लोकांमध्ये आलेलं नैराश्य आणि जे होईल ते देवाच्या इच्छेनं होईल, यांचं मिश्रण आहे. मानवी वर्तणूक आणि संबद्ध विज्ञान संस्थाचे संचालक निमेश देसाई म्हणतात की मास्क न घालणे आणि सामाजिक अंतर न पाळणे यासारख्या दुर्लक्षाचे कारण म्हणजे लोक समोरचा धोका पाहण्यास सक्षम नाहीत. ते म्हणाले, की भारतात सामाजिक बेजबाबदारीची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात दिसते. ते म्हणाले, की लोकांचं हे वागणं बदलणं अवघड आहे, मात्र अशक्य नाही.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एपिडेमिओलॉजी अँड कम्युनिकेशनल डिसिजेस विभागाचे माजी प्रमुख कांत म्हणाले की, लोक ज्या प्रकारे कोरोनाच्या नियमांचं पालन करतील त्यावर रुग्णसंख्येतील वाढ किंवा घट अवलंबून असेल. देसाई म्हणाले, “गेल्या दोन दशकांत विकसित देशांना हे समजले आहे की प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य हे त्याच्या जीवनशैली आणि वागण्यावर अवलंबून असते. मात्र, ते आपल्या समाजात नाही. “