पुढील महिन्यापासून स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? OPEC+ देशांनी घेतला मोठा निर्णय…!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ जुलै । येणाऱ्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) कमी होण्याची शक्यता आहे. कारण ओपेक प्लस (OPEC plus) देशांनी ऑगस्ट महिन्यापासून तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी ओपेक प्लस देशांच्या मंत्र्यांनी ऑगस्ट महिन्यापासून तेल पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना संकटानंतर आता जागतिक अर्थव्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होताना दिसत आहे. यामुळे तेलाची मागणीही वाढली आहे. मात्र, उत्पादनाची मर्यादा असल्याने सद्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत अडीच वर्षांच्या तुलनेत सर्वोच्च स्थरावर जाऊन पोहोचली आहे. या आठवड्यात कच्च्या तेलाचा क्लोजिंग दर 73.14 डॉलर प्रति बॅरल होता. तर जुलै महिन्यात हा दर 78 डॉलरपर्यंत पोहोचला होता. गेल्या तीन महिन्यात सातत्याने झालेल्या वाढीनंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत या महिन्यात साधारणपणे 2 टक्क्यांनी घसरण बघायला मिळाली आहे.

या बैठकीत ओपेक देशांशिवाय रशियासारख्या इतर देशांनीही सहभाग घेतला होता. गेल्या वर्षी ओपेक प्लस देशांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रोज 10 मिलियन बॅरल्स उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर यात हळूहळू वाढही करण्यात आली. मात्र, अद्यापही यात रोज 5.8 मिलियन बॅरलची कपात दिसत आहे.

आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, की ओपेक प्लस देश एकत्रितपणे दर महिन्याला रोजच्यारोज 4 लाख बॅरल उत्पादन वाढवतील. यासाठी ऑगस्ट महिन्यापासून सुरूत होईल. आजच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दिवसाला 8 लाख बॅरल एवढे उत्पादन वाढेल. याप्रमाणे, ऑक्टोबर महिन्यात रोज 12 लाख बॅरल, नोव्हेंबर महिन्यात रोज 16 लाख बॅरल तर डिसेंबर महिन्यात रोज 20 लाख बॅरलपर्यंत उत्पादन वाढेल. आज युएई आणि सौदी अरेबिया यांच्या सहमतीनंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, उत्पादन वाढविण्याची संधी सर्वच देशांना देण्यात आली आहे.

पेट्रोलने 17 राज्यांत 100 पार –
देशातील तब्बल 17 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्याही पुढे गेले आहेत. यात, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, राजस्थान, लडाख, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब, सिक्कीम आणि पुदुचेरी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात आजपर्यंत पेट्रोलच्या दरात 9 वेळा, तर डिझेच्या दरात 5 वेळा वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *