महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । सोमवारी अचानक अनिल देशमुख व्हिडिओवर प्रकट झाले. मला ईडीचे समन्स आल्यानंतर मी सुप्रीम कोर्टात रीतसर याचिका दाखल केली असून न्यायालयाच्या निकालानंतर मी स्वत: ईडीसमोर माझे म्हणणे मांडण्यासाठी जाणार आहे, असे देशमुख यांनी या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. देशमुख हे गृहमंत्री असताना तयार करण्यात आलेल्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर हा व्हिडिओ जारी करण्यात आला. यात ते अतिशय दबक्या आवाजात बोलत असून कुठे शूट करण्यात आला, हे कळू नये याची खबरदारी घेतली आहे. देशमुख यांच्या घरी रविवारी ईडीने छापेमारी केली होती. तेव्हापासून ते नॉट रिचेबल आहेत.
चार कोटींचीच संपत्ती जप्त
देशमुख कुटुंबीयांची सुमारे ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये अनिल देशमुख यांचे वरळीतील घर तसेच त्यांचा मुलगा सलील देशमुख यांनी २००६ मध्ये उरण येथे घेतलेली जमीन आदींचा समावेश आहे. मात्र काही प्रसारमाध्यमांनी ही जमीन ३०० कोटी असल्याचे भासवून संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या दिल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे.