चाळीसगावात स्मारकाच्या नूतनीकरणात आढळले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन अस्थिकलश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ जुलै । चाळीसगाव । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे नूतनीकरण सुरू आहे. गुरुवारी चबुतऱ्याच्या उत्खननात डॉ. आंबेडकर यांचे दाेन अस्थिकलश आढळले. ही वार्ता शहरात पसरताच अस्थिकलशांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

चाळीसगाव घाट राेडवर पालिकेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नूतनीकरण व परिसराचे सुशोभीकरण केले जात आहे. सुमारे १ कोटी रुपये खर्चातून हे काम होत आहे, तर दलित वस्ती सुधार योजनेतून पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी २६ लाखांचा निधी खर्च होत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी खाेदकाम सुरू आहे. गुरुवारी (दि.२२) दुपारी जुन्या पुतळ्याखाली असलेल्या चबुतऱ्यांचे उत्खनन सुरू असताना, १० फूट खोलीवर काँक्रीटमध्ये डॉ. आंबेडकरांचे दोन अस्थिकलश आढळले. याची माहिती मिळताच नगरसेविका सायली जाधव, रोशन जाधव, नगरसेवक रामचंद्र जाधव, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागूल, बबलू जाधव, गौतम जाधव, माजी आमदार साहेबराव घोडे, अमोल घोडे आदींनी त्या ठिकाणी धाव घेतली. या ठिकाणी तहसीलदार अमोल मोरे, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड आदींनी भेट देऊन माहिती घेतली.

एका अस्थिकलशावर इंद्रायणीबाई पुंडलिक वाघ (सायगाव) तर दुसऱ्या कलशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती चाळीसगाव (१९६०) असा उल्लेख आहे.

असा आहे अस्थिकलशांचा इतिहास
डॉ. आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो अनुयायी उपस्थित होते. अंत्यसंस्कारानंतर डॉ.आंबेडकरांचे दोन अस्थिकलश चाळीसगाव येथे आणले. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने सन १९५८ ते ६१ दरम्यान आताच्या डॉ. आंबेडकर चौकात पुतळा बसवण्यात आला होता. तेव्हा हे अस्थिकलश त्या पुतळ्याच्या पायथ्याशी जमिनीत ठेवण्यात आले होते. आता पुतळ्याचे नूतनीकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. त्यादरम्यान गुरुवारी दुपारी हे अस्थिकलश आढळले. त्यांची नवीन पुतळ्याच्या ठिकाणी पुनर्स्थापना केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *