भारतीय उसेन बोल्टने नाकारली मोदी सरकारची ऑफर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – बंगळुरू – रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाऱ्या स्पर्धेत जमैकाच्या उसेन बोल्टचाही वर्ल्ड रेकॉर्ड कर्नाटकच्या श्रीनिवास गौडाने मोडीत काढल्यानंतर त्याच्यापुढे मोदी सरकारने एक ऑफर ठेवली होती. पण मोदी सरकारची ऑफर श्रीनिवासने धुडकावून लावली आहे. दक्षिण कन्नडा जिल्ह्यातील मुदाबिदरी गावचा श्रीनिवास हा रहिवाशी असून तो कंबालामध्ये (चिखलगुट्टा पद्धतीच्या पारंपरिक बैलगाडी शर्यत) विक्रम नोंदवल्यानंतर चर्चेत आला आहे. रेड्यांना घेऊन पाण्यातून धावणाऱ्या स्पर्धेत श्रीनिवासने १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले. याचा अर्थ गौडाने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले.

जमैकाच्या उसेन बोल्टच्या नावे जगात सर्वात जलद धावण्याचा विक्रम आहे. १०० मीटरचे अंतर त्याने ९.५८ सेकंदात पूर्ण केले होते. श्रीनिवास आणि बोल्टची तुलना केल्यास ०.०३ ने श्रीनिवास पुढे आहे. पण दोघांच्या विक्रमाची तुलना केली जाऊ शकत नाही. कारण रेड्यांसोबत श्रीनिवास चिखलात पळाला होता.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल घेतली. देशाला तो ऑलिम्पिक पदक जिंकवून देऊ शकतो, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते. क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी महिंद्रा यांच्या ट्विटला उत्तर देताना कर्नाटकच्या श्रीनिवासनला आम्ही ट्रायलसाठी बोलावणार आहे. त्याची ट्रायल ‘साई’मधील प्रशिक्षक घेतील. अॅथलॅटीक्सबाबत भारतामध्ये फार कमी लोकांना जाण आहे. पण आम्ही भारतामधील प्रतिभा वाया जाऊ देणार नाही, असे उत्तर दिले होते.

पण, एका इंग्रजी माध्यमाने आता श्रीनिवास यांनी ट्रायलला नकार दिल्याचे वृत्त दिले आहे. इंग्रजी माध्यमाच्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची श्रीनिवासने भेट घेतली. त्याने यावेळी सांगितले की, बोल्टशी माझी तुलना होत आहे हे पाहून मला आनंद होतो. पण माझी आणि बोल्टची तुलना होऊ शकत नाही. कारण रेड्यांची मदत मला धावताना मिळते. मी बोल्टचा विक्रम मोडू शकत नाही. कारण मी चिखलात धावतो. याउलट बोल्ट चिखलात धावू शकत नाही. तो मैदानात धावतो. बोल्टने जगभरातील चाहत्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. तर मी कंबालामध्ये लोकप्रिय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *