महाराष्ट्र २४- नवी दिल्ली : चीनमधील करोना विषाणूचा परिणाम कमॉडिटी बाजारावर झाला आहे. कमॉडिटी एक्सचेंजमध्ये मंगळवारी सोन्याचा भाव वधारला. सोन्याचा भाव १७९ रुपयांनी वधारून ४० हजार ९३५ रुपये झाला. चांदीच्या भावात २२५ रुपयांची वाढ झाली. चांदीचा भाव प्रति किलो ४६ हजार ३४८ रुपये आहे.
सराफा बाजारात मागील काही सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र आज पुन्हा जगभरातील भांडवली बाजारात ‘करोना’चे पडसाद उमटले. गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री करून सोने खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे आज बाजारात सोने दरात वाढ झाल्याचे कमॉडिटी विश्लेषकांनी सांगितले. एमसीएक्स या वायदे बाजारात (एमसीएक्स) सोने मागील चार सत्रांत ७०० रुपयांनी वधारले होते.