महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये नवा उत्साह संचारताना दिसत आहे. यामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या बांधकाम उद्योगातही धुगधुगी निर्माण झाली असून येत्या काही दिवसांमध्ये हा व्यवसाय पूर्ण गती पकडेल, असा अंदाज नाईट फ्रँक, फिक्की आणि नारडेको यासारख्या संस्थांनी वर्तविला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बांधकाम साहित्याचा पुरवठा ठप्प झाल्याने आणि अनेक मजूर गावी निघून गेल्याने या क्षेत्राला मोठा फटका बसला. नाईट फ्रँक-नारडेकोच्या रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली. या सर्वेक्षणानुसार, जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत एप्रिल-जून तिमाहीत सेंटिमेंट स्कोर 57 टक्क्यांवरून 35 टक्क्यांवर आला. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत तर हा सेंटिमेंट स्कोर 22 टक्के इतका होता. त्या तुलनेत आताची परिस्थिती बरीच चांगली आहे. मात्र, आगामी काळात हे चित्र वेगाने बदलेल. लोक पुन्हा घर खरेदीला सुरुवात करतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.