महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । राज्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या संकटातही दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच धरण हे जवळपास निम्मे भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये 48.41 टक्के पाणीसाठा आहे. आठ दिवसांपूर्वी सर्व धरणांमध्ये सरासरी 32 टक्के पाणीसाठा होता. मात्र आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे 16 टक्के पाणीसाठा वाढून तो 48 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत 9 टक्के पाणीसाठा जास्त आहे. आठवडाभरातील अतिवृष्टीमुळे राज्यातील बऱ्याच भागात पिण्याच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे.
राज्यातील कुठल्या विभागातील धरणांमध्ये सध्या किती पाणीसाठा?
विभाग – धरणातील पाणीसाठा
अमरावती – ४६.१५ टक्के
औरंगाबाद – ३३.७३ टक्के
कोकण – ५८.७ टक्के
नागपूर – ३६. ४६ टक्के
नाशिक – ३१.२७ टक्के
पुणे – ६४.१५ टक्के
एकूण सरासरी पाणीसाठा – ४८.४१ टक्के
मुंबईतील सात तलावातही मोठा पाणीसाठा जमा
तर दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावातही मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत एप्रिलपर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मुंबईतील तलावात सध्या 9,36,933 दशलक्ष लीटर पाणी जमा झाले आहे. हे पाणी पुढील आठ महिन्यांना पुरणारे म्हणजेच एप्रिल 2022 अखेरपर्यंत पुरणारे आहे. विशेष म्हणजे तलावांत गेल्या दोन वर्षांतील रेकॉर्ड मोडत सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात तलावांतून दररोज 3800 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. पालिका वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध पाणीसाठय़ाचा आढावा घेतला जातो. यावेळी 1447363 दशलक्ष लीटर पाणी असणे आवश्यक असते. त्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीपासूनच तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होणे मुंबईकरांसाठी आवश्यक असते. मात्र या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पावसाने तलावक्षेत्राला ओढ दिल्याने केवळ 18 टक्के पाणी शिल्लक होते. त्यामुळे पालिकेने पाणीकपातीचे संकेतही दिले होते. मात्र गेल्या दहा दिवसांपासून तलावक्षेत्रात होणाऱया जोरदार पावसामुळे समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.