रविवार असो किंवा सार्वजनिक सुट्टी, पगार मिळण्यात नाही येणार अडथळा; RBI ने बदलला नियम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । शनिवार, रविवार किंवा अन्य एखादी सार्वजनिक सुट्टी आली तर मात्र पगारदार कर्मचाऱ्यांच्या (Salaried Employee) सगळ्या उत्साहावर पाणी पडतं कारण सुट्टीमुळे पगाराचा दिवस पुढे जातो. अर्थात काही कंपन्या पगाराच्या दिवशी सुट्टी आली असेल तर आधीच पगार खात्यात जमा करतात. मात्र सर्वसाधारणपणे सर्व खासगी कंपन्या महिना अखेरीस किंवा एक तारखेला पगार करतात. त्यात सुट्टी आली की मात्र उशीर होतो. आता मात्र असं होणार नाही कारण रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank of India) सुटीच्या दिवशीही ही कामे होण्याची तरतूद केली आहे. त्यामुळं सुटी असल्यानं बँक बंद होती असं कारण देता येणार नाही. एक ऑगस्टपासून आठवड्याचे सातही दिवस खात्यात पगार जमा करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. त्यामुळं पगार, पेन्शन अगदी वेळेवर खात्यात जमा होतील. आजतकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

याकरता रिझर्व्ह बँकेनं नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात (National Automated Clearing House) ‘नॅच’च्या (NACH) नियमांत बदल केले असून, आता 1 ऑगस्टपासून आठवडाभर 24 तास या सेवा मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांची याबाबतीतील प्रतीक्षा कायमची संपली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी गेल्या महिन्याच्या पतधोरण आढावा बैठकीत (RBI’s Monetary Policy) याची घोषणा केली होती.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट अर्थात आरटीजीएस (RTGS) सेवा आठवड्याचे सर्व दिवस उपलब्ध केली असून त्याकरता बँकांमध्ये नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात ‘नॅच’ची (NACH) सेवा आठवड्यातील सर्व दिवस लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सुटीच्या दिवशीही पगार, पेन्शन तसंच कर्जाचा हप्ताही दिला जाऊ शकेल.

नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस अर्थात नॅच ही बल्क पेमेंट सिस्टम (Bulk Payment System) आहे. सर्व बँकांचे कामकाज या यंत्रणेद्वारे चालते. ती नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (एनपीसीआय-NPCI) चालवली जाते. नॅचद्वारे डेबिट आणि क्रेडिट सेवा दिली जाते. क्रेडीट सेवेद्वारे बँकेतील आपल्या खात्यात जमा होणारा पगार, पेन्शन, लाभांश आणि व्याज जमा होते तर डेबिट सेवेद्वारे वीज, गॅस, टेलिफोन, पाणी इत्यादी बिले, कर्ज ईएमआय, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि विमा हप्ता यांचे पेमेंट सुविधा दिली जाते.

 

आतापर्यंत या सर्व सुविधांचा लाभ सोमवार ते शुक्रवार म्हणजेच आठवड्यातील कामकाजांच्या दिवशीचा मिळत असे; पण आता आठवड्याच्या शेवटी साप्ताहिक सुटीच्या दिवशीदेखील या सुविधा मिळणार आहेत. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. कारण नॅचद्वारेच डिजिटल पद्धतीनं डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) सेवा दिली जाते. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात (Corona Pandemic) तर गरजू व्यक्तींपर्यंत सरकारी अनुदान वेळेवर आणि पारदर्शक पद्धतीनं पोहोचवण्यात याच यंत्रणेची मदत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *