दोन्ही डोस घेतल्यानंतर ‘इतक्या’ दिवसांत कमी होतोय लशींचा प्रभाव!

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । करोनाच्या संसर्गाची लागण होण्यापासून बचाव करण्यासाठी लस प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे. अनेक देशांमध्ये लसीकरणावर भर देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर त्याची परिणामकता सहा आठवड्यानंतर कमी होत असल्याचे समोर आले आहे.

‘फायझर’ आणि ‘अॅस्ट्राझेनेका’ या लशींची गुणकारकता सहा आठवड्यांनंतर हळूहळू कमी होते, अशी माहिती ‘लॅन्सेट’ या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका लेखात देण्यात आली आहे. दहा आठवड्यांनंतर तर ही गुणकारता थेट ५० टक्क्यांनी कमी होते, असे या लेखात म्हटले आहे.

ब्रिटनमधील ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’मधील संशोधकांनी याबाबत संशोधन केले आहे. या गतीने लशींची गुणकारकता कमी होत राहिल्यास काही काळाने लशींमुळे कितपत संरक्षण मिळेल, याबाबत साशंकताच आहे,’ अशी भीतीही या संशोधन लेखात व्यक्त करण्यात आली आहे. ‘यूसीएल व्हायरस वॉच’ नावाच्या या अभ्यासात म्हटले आहे, की फायझरच्या लशीचे दोन डोस घेतल्यानंतर अॅस्ट्राझेनेकाच्या तुलनेत अधिक रोगप्रतिकारक्षमता मिळते. कोव्हिड १९ बाधितांपेक्षा लसीकरण झालेल्यांमध्ये अॅण्डीबॉडी अधिक असतात,’ असेही संशोधनात आढळले आहे.

युसीएल ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इन्फोर्मेटिक्स’च्या मधुमिता श्रोत्री यांनी सांगितले की, अॅस्ट्राझेनेका अथवा फायझरच्या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात अॅण्टीबॉडीचा स्तर खूप अधिक असतो. यामुळे करोना विषाणूविरोधात प्रतिकारक्षमता निर्माण होते. मात्र ही रोगप्रतिकारशक्ती दोन ते तीन महिन्यात हळूहळू कमी होते,’ असेही त्यांनी म्हटले.

‘फायझर’च्या लशीची रोगप्रतिकारक्षमता ७० दिवसांनंतर साधारण ५० टक्क्यांनी कमी होते. ‘अॅस्ट्राझेनेका’च्या लशीमुळे निर्माण झालेली प्रतिपिंडे (अॅण्टीबॉडी) ७० दिवसांनी पाच पटींनी कमी होतात,’ असेही संशोधनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *