भाजप सोबत युतीबद्दल राज ठाकरेंनी प्रथमच मांडली जाहीर भूमिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाशी युतीच्या शक्यतेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. ‘माझ्या भूमिका स्पष्ट असतात आणि मी त्या वेळोवेळी मांडल्या आहेत. चालता, चालता भूमिका बदलण्याची माझी पद्धत नाही. त्यामुळं चंद्रकांत पाटील किंवा अन्य कुणी काही बोललं असेल तर तेवढ्यावरून युतीचं सूत जुळवू नका,’ असं राज यांनी सांगितलं. (Raj Thackeray on Alliance with BJP)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १०० व्या वर्षात पदार्पण केलं. त्यांचं अभिष्टचिंतन करण्यासाठी राज ठाकरे आज पुण्यात आले होते. तिथं पत्रकारांशी संवाद साधताना राज यांनी मनसे व भाजपच्या संभाव्य युतीच्या चर्चांवर मतप्रदर्शन केलं.

नाशिकमधील भेटीनंतर राज ठाकरे यांनी आपल्याला हिंदीमध्ये केलेल्या भाषणाची एक क्लिप पाठवल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. तसंच, मनसेनं परप्रांतीयांबाबतची भूमिका बदलल्यास युती होऊ शकते, असंही वक्तव्य केलं होतं. त्याबाबत राज यांनी आपली बाजू मांडली. ‘नाशिकमध्ये आमच्या भेटीत युतीबद्दल जुजबी चर्चा झाली होती. यूपी, बिहारमधील लोकांसमोर मी केलेल्या भाषणाचा उल्लेख त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी केला. त्यावर, माझी भूमिका यूपी, बिहारच्या लोकांना कळली. तुम्हाला कळली नसेल तर मी ती क्लिप पाठवतो असं मी त्यांना म्हणालो होतो. त्यांनी ते भाषण ऐकण्याची इच्छा दर्शवली होती. ही गोष्ट मी नंतर माझ्या काही नेत्यांना सांगितली. त्यातल्या कुणी त्यांना क्लिप पाठवली असेल तर माहीत नाही. पण मी ती क्लिप पाठवलेली नाही आणि तेवढ्यावरून कुठलेही अर्थ काढू नका,’ असं राज म्हणाले.

‘माझ्या ज्या काही भूमिका आहेत, त्या स्पष्ट आहेत. त्या महाराष्ट्र हिताच्या आणि देशहिताच्या आहेत. प्रत्येक राज्यानं आपली भूमिका कशी ठेवली पाहिजे, याबद्दल माझ्या पक्षाचं एक धोरण आहे. इतरांनी आमच्यावर आक्रमण करू नये, म्हणजे आम्ही तुमच्या वाटेला जाणार नाही, असं आमचं म्हणणं आहे. ती मर्यादा ओलांडली की प्रश्न निर्माण होतात. आसाम आणि मिझोराम मध्ये सध्या तेच सुरू आहे,’ याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *