HSC Result 2021 : बारावीचा निकाल आज, कसा अन् कुठे पाहाल?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ ऑगस्ट । Maharashtra HSC Result 2021: पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२१मध्ये बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंगळवारी (ता. ३) दुपारी चार वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाने जाहीर केल्याने लाखो विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे.

राज्य मंडळाच्या २०२१ मध्ये बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकालात पाहता येणार आहेत. २०२१मध्ये आयोजित केलेली बारावीची परीक्षा राज्य सरकारच्या निर्णयामुळे रद्द करण्यात आली. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे. तसेच २०२१मधील बारावीच्या परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार केलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध राहील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

दहावीच्या निकालाच्या वेळी एकच संकेतस्थळ उपलब्ध असल्याने तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परिणामी विद्यार्थ्यांना वेळेत निकाल पाहता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी राज्य मंडळामार्फत एकापेक्षा जास्त लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाची सांख्यिकीय माहिती ‘www.mahresult.nic.in’ आणि ‘https://msbshse.co.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

निकाल पाहण्यासाठी लिंक

१) https://hscresult.11thadmission.org.in

२) https://msbshse.co.in

३) hscresult.mkcl.org

४) mahresult.nic.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *