महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत-चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत असताना शहीद झाले. या पोस्टची उंची 17 हजार 292 फूट आहे. 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्टवरून लिंकसोबत परत येत असताना पवार यांना अचानकमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवली. त्यावेळी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर येवून ते खाली पडले. यामुळे त्यांना जबर मार लागला आणि ते गतप्राण होवून शहीद झाले. त्यांच्यावर चिखली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहीद जवान कैलास पवार यांचे पार्थिव 2 ऑगस्ट 2021 रोजी लेह येथून दिल्ली येथे आणण्यात आले. यानंतर 3 ऑगस्ट रोजी दिल्ली येथून मुंबई आणि दुपारी 12.30 वाजता विमानाने मुंबई येथून औरंगाबाद येथे आणण्यात आले. एअर फोर्स स्टेशन औरंगाबाद येथे स्टेशन कमांडर, जिल्हाधिकारी व अतिरिक्त आयुक्त यांनी शहीदाच्या पार्थिवास मानवंदना दिली.
“पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार”
यानंतर पार्थिव शरीर मिल्ट्री हॉस्पिटल, औरंगाबाद येथे ठेवण्यात आले. आज (4 ऑगस्ट रोजी) पहाटे 5 वाजता शहीद जवानाचे पार्थिव शरीर औरंगाबाद येथून जवानाच्या राहत्या घरी गजानन नगर (चिखली) रवाना झाले. चिखली येथे शहीद जवान कैलास पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी दिलीय.