महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑगस्ट । सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्क हा त्यांच्या शुद्धतेची खात्री दर्शविणारा असतो. अनेक ज्वेलर्स संपूर्ण प्रक्रियेचे पालन न करताच दागिन्यांवर हॉलमार्क लावतात. त्यामुळे ग्राहकांनी दागिने खरेदी करताना हॉलमार्क खरा आहे किंवा नाही, हे तपासून घेतले पाहिजे. हॉलमार्कवर भारतीय मानक ब्युरोचा त्रिकोणी आकाराचा लोगो असतो. त्यामध्ये हॉलमार्किंग केंद्रासह सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाण नमूद केलेले असते. तसेच दागिना कधी घडवला याची तारीख आणि संबंधित ज्वेलर्सचा लोगोही असतो.
केंद्र सरकारने येत्या 31 ऑगस्टपासून एका नव्या नियमाची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. त्यानुसार हॉलमार्किंगसाठी सराफा व्यापाऱ्यांना केवळ एकदाच नोंदणी करावी लागेल. नंतरच्या काळात नुतनीकरणाची गरज भासणार नाही. हॉलमार्किंगच्या नियमाचा व्यापारी आणि ग्राहक या दोघांनाही फायदा होणार आहे.
हॉलमार्किंग असलेला दागिना खरेदी केल्याच्या काही वर्षांनंतर विकायला काढल्यास त्याचे मूल्य घटणार (Depriciation Cost) नाही. हे सोने पूर्णपणे शुद्ध असल्याने तुम्हाला विक्रीनंतर दागिन्याची संपूर्ण किंमत मिळेल.
हॉलमार्किंगमुळे व्यापाऱ्यांच्या खर्चात वाढ
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क बंधनकारक केल्यामुळे लहान व्यापाऱ्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे पेढ्यांवर संगणक आणि हॉलमार्किंगविषयी ज्ञान असलेले कर्मचारी ठेवावे लागतील. याशिवाय, हॉलमार्किंगसाठी दागिने पाठवायचे असल्यास ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते.
लहान व्यापाऱ्यांना या ऑनलाईन व्यवहारांची तितकीशी सवय नाही. तसेच लहान ज्वेलर्स किंवा पेढ्यांवर दागिन्यांची संख्या अधिक असल्याने हॉलमार्किंग सेंटर्सना त्याचा तपशील ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत.