महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याच्या अपेक्षेला केंद्र सरकारने सोमवारी मोठा धक्का दिला. इंधन दरवाढीला यूपीएचे सरकार जबाबदार आहे. काँग्रेसच्या मनमोहन सरकारने इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी 1.44 लाख कोटींचे तेल बॉण्ड जारी करून कर्ज घेतले होते. त्याचा भार आमच्यावर पडलाय. त्यामुळे आता आम्ही इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करू शकत नाही, असे विधान करीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंधन दरवाढीचे खापर यूपीए सरकारवर फोडले आहे.
जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारे चर्चा करीत नाही तोपर्यंत यावर कोणताही तोडगा निघणार नाही. जर आमच्यावर कर्जाचा भार नसता तर आम्ही इंधनाचे उत्पादन शुल्क कमी करू शकलो असतो. सध्याच्या इंधन दरवाढीला पूर्णपणे काँग्रेसची धोरणे जबाबदार आहेत, असे विधान अर्थमंत्री सीतारमन यांनी सोमवारी केले. यूपीए सरकारने तेल बॉण्ड जारी करून इंधनाच्या किमती कमी केल्या. आम्ही ती चाल खेळणार नाही, अशा शब्दांत त्यांनी यूपीए सरकारवर निशाणाही साधला.