महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । न्यूझीलंडमध्ये गेल्या सहा महिन्यांत एकही नवा कोरोनाबाधित सापडला नव्हता. मात्र आज तिथे तब्बल सहा महिन्यांनंतर पहिला कोरोनाग्रस्त सापडला. याचा धसका या देशाने घेतला आणि पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी संपूर्ण देशात कठोर लॉकडाऊनची घोषणा करून टाकली. पंतप्रधान आर्डर्न यांच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत आहे.
न्यूझीलंडमध्ये गेल्या 6 महिन्यांपासून एकही नवा कोरोनाबाधित सापडला नव्हता. जगभरात सर्वात आधी कोरोनामुक्त होणारा देशदेखील न्यूझीलंडच होता. त्यामुळे या देशात निर्बंध उठवण्यात आले होते. सर्व व्यवहारदेखील सुरळीत पद्धतीने सुरू होते. मात्र न्यूझीलंडमधील सर्वात मोठे शहर असलेल्या ऑकलंडमध्ये हा कोरोनाबाधित सापडल्यामुळे यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर डेल्टा या वेगाने संसर्ग होणाऱया प्रकाराने बाधित झाल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवताच प्रशासनाची झोप उडाली.