महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवाजी पार्कवर जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे. मुंबईतल्या जन आशीर्वाद यात्रेत (Jan Ashirvad Yatra) राणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणार की नाही, अशी चर्चा उभ्या महाराष्ट्रात रंगली होती. मात्र मुंबईतलं पहिलं भाषण आवरुन राणे थेट शिवाजी पार्कवर गेले आणि बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं.
यावेळी राणेंंसोबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, आमदार अतुल भातखळकर, निलेश राणे, तृप्ती सावंत उपस्थित होत्या.
मोदी सरकारमधील मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा (Jan Ashirvad Yatra) सुरु आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागत आहेत. सकाळी 11 वाजता त्यांचं मुंबई विमानताळवर आगमन झालं. त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं.
“महाराष्ट्रातील सरकाराने गेल्या अडीज वर्षात कोणताही विकास केलेला नाही. उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.