महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑगस्ट । गेल्या काही दिवसांमध्ये पुणे (Pune) जिल्ह्यात डेंग्यू (Dengue) आणि चिकनगुनियाच्या (Chikungunya) रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंग्यू, टायफॉईड (Typhoid) , चिकुनगुनिया, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. या आजारांमध्ये ताप (Fever), अतिसार, उलट्या होणे (Vomit), डोकेदुखी (Headache) आणि सांधेदुखीसारखी (Arthritis) लक्षणे दिसून येतात. गेल्या दोन आठवड्यांत या रुग्णांमध्ये सरासरी 7 ते 10 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. (The number of patients with dengue and chikungunya is increasing rapidly in Pune district)
गेल्यावर्षी लॉकडाऊनकाळात लोकांचं बाहेरचं खाणं बंद झालं होतं. त्यात गेल्यावर्षी पावसाळ्यातही अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना लॉकडाऊन काळात फारशी सूट नव्हती. त्यामुळे लोकांचा घराबाहेरचा वावर कमी होता. या कारणाने विषाणूजन्य आजारांचं प्रमाण दरवर्षीपेक्षा गेल्यावर्षी कमी झालं होतं. पण आता अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. याचा परिणाम आता आरोग्यावर होऊ लागला आहे. परिणामी आजारांचं प्रमाण वाढत आहे.
जुलै महिन्यात पुण्यात डेंग्युचे 107 संशयित रुग्ण आढळले होते. त्यापैकी 86 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. याशिवाय ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत डेंग्युचे 87 संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 18 जणांना डेंग्युची लागण झालेली आहे. याशिवाय खासगी रुग्णालयांमध्येही अनेकजण डेंग्युसदृष्य आजारावर उपचार घेत आहेत. यामध्ये संशयित रुग्णांची संख्याही शेकड्यांमध्ये आहे.
जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत पुणे शहरात स्वाईन फ्लूचे 65, चिकनगुनियाचे 84, डेंग्यूचे 135 तर मलेरियाचे 2 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना उपाययोजनांध्ये व्यस्त असलेल्या आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे.
डेंग्यू किंवा चिकनगुनियासारखे लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये आढळल्यास त्याची तात्काळ तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. शिवाय ज्या जागांवर डासांची उत्पत्ती होऊ शकते अशा ठिकाणी विशेष स्वच्छता ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. जलाशयाच्या ठिकाणी गप्पी मासे सोडावेत जेणेकरून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण आणता येईल असंही सांगण्यात आलं आहे. नागरिकांनाही स्वच्छता ठेवण्याचं आणि लक्षण आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे