कोरोनोव्हायरस; सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्या विरोधात राज्य सरकारकडून गंभीर दखल;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ मुंबई,  : चिकन खाल्यामुळे कोरोनोव्हायरस होतो या अफवे विरोधात राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारच्यावतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल केला आहे. या अफवेमुळे मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.काही अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं केदारांनी सांगितलं. खरंतर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाव्हायरसमुळे संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण आहे. त्यात याचा फायदा घेत काही लोक नको त्या अफवा पसरवतात. अशा लोकांवर राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे.
चीनच्या वुहानमधून जगभरात हातपाय पसरणाऱ्या कोरोनाव्हायरसचा धसका संपूर्ण जगानं घेतला आहे. भारतातल्या लोकांनी तर अगदी चिकन , अंडी खाणंही सोडून दिलं होतं. त्यामुळे पोल्ट्री फार्म आणि शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला होता. चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, असं बरेच मेसेज सोशल मीडियावरही फिरत होते. त्यामुळे तुमच्या ताटात चिकन किंवा अंडं आलं तर त्यावर ताव मारण्याआधी आपल्याला कोरोनाव्हायरस तर होणार नाही, असा प्रश्न मनात येणं साहजिकच आहे. पण ही फक्त एक अफवा असल्याचं समोर आलं आहे.
चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे. खुद्द केंद्र सरकारने याची पुष्टी दिली आहे. चिकन, अंडी खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होत नाही, असं केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. पशुपालन मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितलं होतं की, ‘चिकन खाल्ल्याने कोरोनाव्हायरस होतो, ही अफवा आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.’
कोरोनाव्हायरस हा एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होतो आहे. चिकन खाल्ल्याने कोणत्याही व्यक्तीला कोरोनाव्हायरस झालेला नाही. जगभरातील कोरोनाव्हायरसचा पोल्ट्री उत्पादनांशी काहीच संबंध मिळालेला नाही. त्यामुळे चिकन पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी बिनधास्तपणे खावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *