महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ऑगस्ट । मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीची सीईटी परीक्षा रद्द केली. पण, आता अकरावी प्रवेश प्रक्रियेवेळी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. अकरावी प्रवेशासाठी दुसरा टप्पा बुधवारपासून (ता. १८) सुरू झाला आहे. त्यास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता रविवारपर्यंत (ता. २२) शाखा आणि महाविद्यालयांचा पसंती क्रमांक ठरवावा लागणार आहे. एकूणच नामांकित कॉलेजमध्ये अकरावी प्रवेश घ्यायचे विद्यार्थ्यांचे टेन्शन काही प्रमाणात का होईना आणखी वाढले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच कनिष्ठ महाविद्यालयात मदत केंद्र सुरू आहेत. त्यानुसार काही विद्यार्थी ऑफलाइन, तर कहीजण ऑनलाइन अर्ज भरत आहेत. अडचण आल्यास मार्गदर्शन केंद्रात अर्जाची पूर्तता करण्यात येत आहेत. अंतर्गत मुल्यमापनाद्वारे जे गुण विद्यार्थ्यांना दहावीत मिळाले आहेत. त्या गुणांच्या आधारे आता अकरावीत प्रवेश करावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी दहावीच्या ऐतिहासिक निकालामुळे आलेला गुणांचा फुगवटा आणि ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या पाहता नामांकित कॉलेजमध्ये ९५ टक्के गुणसुद्धा कमी पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण जरी मिळाले असतील, तरी विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेज मिळेल, याची शाश्वती नसल्याचे पालक सीमा शिंदे यांनी सांगितले.
शहरात केंद्रीभूत अकरावी प्रवेश प्रक्रियेला गती आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत ६२ हजार ७८१ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला असून, त्यातील ४५ हजार २६९ विद्यार्थ्यांनी अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच, ४८ हजार ९३३ जणांनी अर्ज लॉक करण्याचा पर्याय निवडला आहे. बुधवारी दाखल झालेल्या अर्जांपैकी २४ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी शाखा आणि महाविद्यालयांचा पसंती क्रमांक नोंदविला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ३०८ कनिष्ठ महाविद्यालयांतील एक लाख १० हजार ५५ जागांसाठी ही केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया होत आहे.
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://pune.11thadmission.org.in या वेबसाइटला भेट द्यावी. यादरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध जागांची माहिती देण्यात येईल. २३ ऑगस्टला सकाळी १० ते २४ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्जात विद्यार्थ्यांना सुधारणा करायची असल्यास या दरम्यान वेळ दिला जाणार आहे.
आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांकरिता महत्त्वाचे सूचनापत्रक मंगळवारी (ता. १७) जारी करण्यात आले. यानुसार ज्या विद्यार्थ्यांना बेस्ट फाइव्हचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी ग्रुप एक, ग्रुप दोनमधील सहा विषयांपैकी कोणतेही पाच विषयांचे बेस्ट फाइव्ह गुण ग्राह्य धरावे किंवा दुसऱ्या पर्यायानुसार ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप तीनमधील गुण विचारात घेण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांच्या ग्रुप एक, ग्रुप दोन व ग्रुप तीनमधील सात विषयांची (सातशे गुण) सरासरी ग्राह्य धरली जाईल.