महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । पुढील महिन्यात 10 ते 19 सप्टेंबरदरम्यान राज्यात गणेशोत्सव साजरा होत असून मुंबई महापालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद ठाणे यांनी शाळांच्या वार्षिक सुट्टय़ांसंदर्भात जाहीर केलेल्या यादीमध्ये गणेशोत्सवासाठी शुक्रवार, 10 सप्टेंबर रोजी केवळ एकच दिवसाची सुट्टी नोंदविण्यात आली आहे. राज्यात गणेशोत्सव साजरा करण्याची मोठी परंपरा आहे. या उत्सवासाठी शाळांना किमान पाच दिवसांची सुट्टी दिली जावी, अशी मागणी दरवर्षी होत असते. असे असूनही शिक्षण विभागाने वार्षिक सुट्टीच्या यादीत फक्त गणेश चतुर्थीच्याच दिवशी सुट्टी जाहीर केल्याने शाळा गोंधळात सापडल्या आहेत. दरम्यान नुकतेच युवासेनेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देऊन गणपतीसाठी शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर करावी तसेच उत्सव काळात चाचणी परीक्षांचे आयोजन न करण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती.
सध्या कोरोना निर्बंधात सूट मिळाल्याने मुंबई, ठाण्यातील अनेक विद्यार्थी पालकांसह गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावी जाण्याच्या तयारीत आहेत, मात्र अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून गणपतीच्या सुट्टीसंदर्भात किती दिवसांची सुट्टी जाहीर करावी, याविषयी लेखी सूचना शाळांना मिळालेल्या नाहीत. उलट 1 जानेवारी रोजी मुंबई महापालिका शिक्षण विभाग आणि ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वार्षिक सुट्टय़ांच्या यादीत गणेशोत्सवासाठी केवळ 10 सप्टेंबर रोजीच सुट्टी असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनच्या काळाच शिक्षण विभागाने गणपतीसाठी सुट्टी जाहीर न केल्याने अनेक शाळांनी या उत्सवादरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाइन चाचणी परीक्षा आयोजित केली होती. त्यामुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांच्याही उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले होते, असे टीचर्स डोमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडया यांनी सांगितले.