महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । भारतीय संघात आता मधल्या फळीत बदल करण्याची वेळ आली आहे. चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे यापैकी एकाच्या जागेवर सूर्यकुमार यादव या युवा चेहर्याला संधी देण्यात यावी, असा सल्ला भारतीय क्रिकेट संघातील माजी यष्टिरक्षक कसोटीपटू फारुख इंजिनिअर यांनी दिला आहे. सूर्यकुमार हा ‘मॅचविनर’ खेळाडू आहे, तो परिस्थितीनुसार स्वत:ला मोल्ड करण्यात पटाईत आहे, असेही इंजिनिअर यांनी म्हटले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून लीडस्वर खेळवण्यात येत आहे. लॉर्डस् मैदानावर भारताने दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-0 आघाडी घेतली आहे. विजेत्या संघात शक्यतो बदल केले जात नाहीत. परंतु, भारताने पुढच्या कसोटीसाठी एक बदल करणे आवश्यक आहे, असे इंजिनिअर यांना वाटते.
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि तिसर्या क्रमांकावरील चेतेश्वर पुजारा यांची कामगिरी खालावल्याने ते टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. त्यांच्या फलंदाजीत सातत्य नाही, असा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहेत. तथापि, लॉर्डस् कसोटीत या दोघांनी भारताला अडचणीतून बाहेर काढले. दोघांनी कठीण काळात शतकी भागीदारी केली. यामुळे भारताला कसोटीत पुनरागमन करता आले; पण शमी आणि बुमराहच्या नवव्या विकेटसाठीच्या भागीदारीमुळे त्यांची खेळी नजरेआड झाली.