गोव्याच्या धर्तीवर कोकणातील किनार्‍यांना मिळणार झळाळी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । समुद्र किनारी वॉटर स्पोर्टस् साहसी क्रीडा खेळ आणि पर्यटकांच्या अनुषंगाने सुविधा देण्यासाठी बीच सॅक धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही सागरी किनार्‍यांचा विकास करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात आठ बीचची निवड करण्यात आली असून त्यावर 80 सॅक उभारण्यात येणार आहेत.

त्यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आता कोकणातील बीच वर बिअर, मद्य यांच्यासह पंचकर्म सुविधाही उपलब्ध होणार आहे. दिवाळीनंतर हे सॅक सुरू करण्याचा मानस पर्यटन विभागाचा आहे. कोकणातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाने कंबर कसली आहे. कोकणाला 720 किमी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

ठाणे, पालघर, रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला समृद्ध किनारपट्टी लागली आहे. त्यामध्ये रायगडमध्ये 20, रत्नागिरी 30, सिंधुदुर्ग 25 आणि ठाणे-पालघरमध्ये 75 समुद्र किनारे आहेत. तर 18 बॅक वॉटर आहेत. या ठिकाणी रिव्हर राफ्टिंग , गरम पाण्याचे झरे, कातळशिल्प , टर्टल नेस्टिंग, स्कुबा ड्रायव्हिंग , कोरल रौफ, डॉल्फिन साईटिंग आदी वॉटर खेळ, साहसी खेळ आदी पर्यटकांचे आकर्षण आहे.

आता साहसी खेळाला राज्य सरकारकडून अधिकृत मान्यता ही देण्यात आलेली आहे. कोकणात पर्यटन वाढीसाठी स्थानिक खाद्य आणि संस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी पर्यटन विभाग प्रयन्त करीत आहे. त्याचा एक भाग म्हणून बीच सॅक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला जात आहे.

पर्यटन विभागाने अधिक चालना देत धोरण निश्चित केले आहे. या धोरणांतर्गत पर्यटनाला चालना देताना 6 ते 7 हजारांपेक्षा अधिक स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल.

अशा या बीच सॅक पॉलिसी अंतर्गत पहिल्या टप्प्यात आठ बीच निवडण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातील केळवा, बोर्डी, रायगडमधील दिवेआगर, वरसोली , रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, अरेवारे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली व कुणकेश्वर या समुद्र किनार्‍यांचा विकास केला जाणार आहे. कोकणात तीन पंचतारांकित हॉटेल उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक किनार्‍यावर 10 सॅक उभारण्यात येणार आहेत.

तब्बल 80 सॅक उभारण्यात येणार असून ते सर्व एकाच आकाराचे आणि डिझाईनचे असणार आहेत. समुद्री किनार्‍यावर सुरक्षिततेच्या माध्यमातून वॉच टॉवर, लाईफ गार्ड, शौचालय, शॉवर, लॉकर , फूड आणि सॉफ्ट ड्रिंक, पंचकर्म सुविधा , वाईन आणि बिअर, पोहचण्याचे साहित्य डेक बेड आणि अम्ब्रेला सुविधा तसेच कॅफेटेरिया यासारख्या सुविधा पर्यटकांचे हित लक्षात ठेवून पुरविण्यात येणार आहेत.

बीच सॅक पॉलिसीअंतर्गत ग्रामपंचायतींना आणि नगर परिषदांना पर्यटकांसाठी सेवा सुविधा देण्यासाठी योग्य तो निधी पुरविला जाणार आहे. सहा बीचवरील जागा ही निश्चित झाल्या असून त्यांचा आराखडाही तयार झाला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर हे सॅक सुरू होऊन कोकणातील बीचेचा कायापालट होण्यास सुरवात होईल.

* रत्नागिरीतील 30, सिंधुदुर्गातील 25 समुद्र किनार्‍यांचा समावेश
* 80 सॅक उभारण्यात येणार; साहसी खेळाला राज्य सरकारकडून अधिकृत मान्यता
* 6 ते 7 हजारांपेक्षा अधिक स्थानिकांना रोजगार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *