महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । मासेमारीच्या हंगामात मच्छीमारांसाठी रोजचा दिवस सारखा नसतो. कधी मासेमारी चांगली झाली तर भरपूर कमाई आणि हाती काहीच लागले नाही तर शून्य कमाई; पण मुरबे गावातील मच्छीमार चंद्रकांत तरे यांचे नशीब एका रात्रीत फळफळले. त्यांच्या बोटीच्या जाळ्यात ‘सोने के दिलवाली मछली’ लागली. हे मासे विकून त्यांना दीड कोटीहून अधिकची कमाई झाली आहे.
पालघरच्या समुद्रात मासेमारीदरम्यान हा चमत्कार झाला आहे. सोमवारी व्यापार्यांनी दीड कोटीची बोली लावून घोळ मासे खरेदी केले. त्यामुळे पुन्हा एकदा मुरबे गाव प्रकाशझोतात आले आहे. यापूर्वी याच गावातील ‘श्री साई लक्ष्मी’ या बोटमालकाच्या जाळ्यात घोळ मासा अडकला होता. त्यामधील बोताची किंमत साडेपाच लाखांहून अधिक होती.
पालघरच्या हद्दीतील खोल समुद्रात 15 मैल अंतरावर मासेमारीसाठी चंद्रकांत तरे यांच्या मालकीची ‘हरबा देवी’ बोट घेऊन मासेमारीसाठी काही तरुण हौसेपोटी समुद्रात मच्छीमार बांधवांना घेऊन गेले होते.यावेळी त्यांनी मासेमारी करण्याकरिता वागरा पद्धतीचे जाळे समुद्रात सोडले असताना समुद्रात टाकलेले जाळे जड झाल्यासारखे जाणवल्याने जाळे बोटीत ओढून जवळ घेतले असता दीडशेहून अधिक घोळ मासे जाळ्यात आढळून आले.पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारीत हा एक चमत्कारी इतिहास घडला आहे. आजपर्यंत एकाचवेळी घोळ जातीचे इतक्या मोठ्या संख्येने मासे जाळ्यात अडकले अशी ही पहिलीच घटना असावी.
घोळ मासा स्वादिष्ट असून, त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने या माशाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे माशाला एवढी किंमत मिळते. जुलै-सप्टेंबरदरम्यान हा मासा समुद्रकिनार्यालगत येतो. या माशाचे जठर व फुफ्फुस आदी अवयवांद्वारे शल्यचिकित्सेला लागणारे धागे (टाके) बनविले जातात.
माशातील कोलेजनचा वापर अनेक औषधांमध्ये केला जातो. त्यामुळेच घोळ माशाला आशिया खंडाच्या पूर्व भागात मोठी मागणी आहे. याच कारणाने घोळ माशाला ‘सोने के दिलवाली मछली’ म्हणून ओळखले जाते. हा मासा साधारणपणे सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकाँग आदी ठिकाणी निर्यात केला जातो. या जातीच्या सर्वात लहान माशाची किंमतही 8 ते 10 हजार रुपये असते.