जो रुटला कायमच अडचण ठरलेला हा फिरकी गोलंदाज ; ४१३ बळी घेतले तरीपण संघा बाहेर ; कोहली- शास्त्री यांच्या मनमानीचा बळी ठरला अश्विन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ सप्टेंबर । भलेही ४१३ बळी घेतले असतील किंवा तुम्ही याच इंग्लंड संघाविरुद्ध पाच महिन्यांपूर्वी ४ कसोटी सामन्यांत ३२ बळी घेतले असतील. शतक झळकावले असेल, जो रुटला १६ कसोटी सामन्यांत ५ वेळा बाद केले असेल किंवा भले तुम्ही त्या मालिकेत मालिकावीर ठरला असाल. तरीही तुम्हाला मालिकेत संघाबाहेर बसावे लागेल आणि तेही ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यापर्यंत.

होय, . अश्विन सातत्याने कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मनमानीचा शिकार ठरत आहे. त्यामुळेच कसोटी क्रिकेटचा हा दिग्गज खेळाडू सध्या बेंचवर बसलेला पाहण्यास मिळत आहे. त्यामुळेच आता संघ व्यवस्थापनाच्या कामकाजावर शंका येत आहे. ज्याप्रकारे फलंदाजी क्रमवारीत अनपेक्षितपणे रवींद्र जडेजाला, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांच्याआधी बढती देण्यात आली. यावरून एक गोष्ट सिद्ध होत आहे की, संघ व्यवस्थापनाला अश्विनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करायचे होते.

जडेजा तर अश्विनच काय, तर रहाणे-पंत यांच्याहूनही चांगला फलंदाज आहे, हेच त्यांना दाखवायचे होते; पण हा निर्णय वाईटरीत्या चुकीचा ठरला. त्यामुळेच, आता कर्णधार आणि प्रशिक्षकांच्या या मनमानीचे मुख्य कारण काय, असा प्रश्न क्रिकेटचाहत्यांना पडला आहे. लॉर्ड्सचा सामना गोलंदाजांच्या शानदार फलंदाजीमुळे आणि इंग्लंडच्या फलंदाजांच्या एका सत्रातील खराब प्रदर्शनामुळे भारताने जिंकला.

कदाचीत याच कामगिरीच्या जोरावर भारताला ओव्हलमध्येही जिंकता येईल; पण तरीही ७९ कसोटी सामन्यांत ४१३ बळी घेणारा, २६८५ धावा काढणारा आणि जो स्वत:च्या चुकीमुळे सहजासहजी बाद होत नाही अशा जो रुटला सातत्याने आपला शिकार बनविणाऱ्या अश्विनला संघाबाहेर बसवून सातत्याने खराब मारा करणाऱ्या जडेजाला संघात ठेवणे, ही मनमानीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *