महाराष्ट्र 24 – बारामती :
वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी मते असू शकतात, याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये काही धुसफुस आहे, असा नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलो आहोत, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहोत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांची शुक्रवारची दिल्ली भेट ही पूर्वनियोजित होती. तीन आठवड्यांपूर्वीच या भेटीचे नियोजन झाले होते. त्यांनी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीत राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मुंबईत बैठकीत चर्चा केली. ‘सीएए’वरून आघाडीत धुसफुस असल्याचा त्यांनी इन्कार केला. आमचे सर्वोच्च नेते जी भूमिका मांडतात, तीच पक्षाची अधिकृत भूमिका असते. त्यामुळे यावर उगाचच काहीही बोलण्यात अर्थ नाही. जोपर्यंत तिन्ही पक्षांचे सर्वोच्च नेते एकत्रितपणे, चर्चेतून काही गोष्टी ठरवतात, तोपर्यंत अन्य कुठल्याही बाबींना महत्त्व नसल्याचे ते म्हणाले.