महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन यंत्रणांकडून केले जात असतानाही पर्यटनस्थळांवरील गर्दी मात्र ओसरलेली नाही. आज रविवारच्या सुटीचा मुहूर्त साधून पर्यटकांनी लोणावळा येथे तुफान गर्दी केली होती. लोणावळ्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर पर्यटक दिसत होते.
पर्यटनस्थळी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन राज्य सरकारकडून वारंवार केले जात आहे. परंतु नागरिकांकडून त्याला पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी होत आहे. विशेष म्हणजे त्यांना आवरण्यासाठी तैनात केलेले पोलिसही जागेवर दिसत नसल्याने पर्यटकांना मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र आहे. अनेकांनी मास्क न घालता धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला.
शेकडो पर्यटकांच्या गाडय़ा आज लोणावळ्यात घुसल्या होत्या. एरव्ही त्यांना अडवून चौकशी करणारे पोलीस रायवूड पार्कच्या चौकात दिसले नव्हते. अनेक पर्यटकांनी आपल्या तोंडावर मास्कही घातले नव्हते असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. सहारा ब्रिज येथे असे दृष्य होते. टायगर पॉईंट, लायन पॉईंट, भुशी धरण येथेही पर्यटकांचा धिंगाणा बिनधास्त सुरू होता.