महाराष्ट्र २४; अहमदाबाद : आज सकाळी ११.४० च्या सुमारास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबीयांसहीत अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर दाखल झाले. ट्रम्प कुटुंबीयांच्या स्वागतासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर हजर झाले होते. मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प, ट्रम् मुलगी इवांका आणि जावई जेरेड कुशनर यांचं स्वागत केलं. यावेळी, मोदींनी ट्रम्प यांना मिठी मारून आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांचं दर्शन घडवून दिलं. विमानतळावर शंखनादात ट्रम्प कुटुंबीयांचं जोरदार स्वागत झाल्यानंतर मोदी आणि ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमाच्या दिशेनं रवाना झाला. साबरमती आश्रमात दाखल झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इथं चरखा चालवला तसंच महात्मा गांधींनाही आदरांजली वाहिली.
यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाच्या व्हिजिटर्स बुकमध्ये नोंदवली आपली प्रतिक्रियाही नोंदवली. प्रतिक्रिया लिहिताना त्यांनी या भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ‘माझे महान मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या शानदार दौऱ्यासाठी आभार’ असं त्यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये लिहिलं. पण यावेळी, ट्रम्प महात्मा गांधींचा उल्लेख करण्यास विसरले.
आजपर्यंत ज्या विशेष व्यक्तींनी साबरमती आश्रमाला भेट दिली, त्यांनी व्हिजिटर्स बुकमध्ये महात्मा गांधींचा, त्यांच्या कार्याचा किंवा त्यांच्या संघर्षाचा उल्लेख केला आहे. परंतु, ट्रम्प यांनी यात केवळ मोदींचा उल्लेख केला.