पुणे : गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी मास्कला हरताळ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । शहरातील गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोरोना प्रतिबंधक मास्कला पुणेकरांनी हरताळ फासल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. प्रमुख मंडळांच्या कार्यकर्त्यांचाही त्याला अपवाद राहील नाही. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा उद्रेक नियंत्रित कसा करायचा ही काळजी आता सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना लागली आहे.

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाला आजपासून सुरवात झाली. गेल्या वर्षी कोरोनाच्या उद्रेकामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. या वर्षीही कोरोनाची दुसरी लाट पसरली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट पडले. मास्क, सोशल डिस्टसिंग आणि सॅनिटाझर या त्रिसूत्री कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा करत आहे. प्रत्यक्षात मात्र, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांच्या नाक आणि तोंडावर मास्क दिसला नाही. रस्त्यारस्त्यांवर आणि चौकाचौकात जमलेले वेगवेगळ्या मंडळांचे बहुतांश कार्यकर्तेही याला अपवाद नव्हते.

पुण्याचा गणेशोत्सव हा आकर्षणाचे प्रमुख केंद्र असते. शहरातील प्रमुख मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवशी दुपारनंतर काही प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे काही अंशी प्रमुख रस्त्यांवर गर्दी झाली.

कोरोनाची पहिली लाटे आणि दुसरी लाट याचे गणितीय प्रारुपाच्या आधारावर विश्लेषण केल्यास सप्टेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी यापूर्वीच वर्तविली आहे. त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि भाविकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *