अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार ; पुणे, पिंपरी चिंचवड जागा रिक्त राहण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर । अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. गुणवत्ता यादीत नाव जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अकरावी प्रवेशाची पहिली आणि दुसरी फेरी यापूर्वीचं पूर्ण झालेली आहे. अकरावी प्रवेशाची पहिल्या फेरीतील गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये यंदाही अकरावीच्या प्रवेशाच्या जवळपास वीस हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. अकरावी प्रवेशासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 316 कनिष्ठ महाविद्यालयातील एक लाख 12 हजार 965 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. अकरावी केंद्रीय प्रवेशाच्या पोर्टलवर प्रवेशासाठी केवळ 85 हजार 518 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील केवळ 77 हजार 986 विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहेत, अशी माहिती आहे.

अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. पहिल्या पर्यायाचे महाविद्यालय जाहीर होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असल्याचे शिक्षण संचालक डी. जी. जगताप यांनी सांगितले आहे. तर, अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, पुरेशा जागा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावेत, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यानं अडचणी निर्माण होत होत्या. शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसेल ते विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करु शकतात, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

अकरावीसाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीला विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केल्याची पोहोच किंवा ती उपलब्ध नसल्यास वडिलांच्या जात प्रमाणपत्राची प्रत सादर करुन प्रवेश निश्चित करु शकतात. प्रवेश निश्चित करणारे विद्यार्थ्यांना 30 दिवसांच्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो. मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून अर्ज करतील त्यांना जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक नाही.

महाविद्यालय अलॉट झालं का कसं तपासायचं?
स्टेप 1 : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.

स्टेप 2: नोंदणीवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा

स्टेप 3 : लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल

स्टेप 4 : वेबसाईटवरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करा

स्टेप 5 : तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं ना तुम्हाला स्क्रिनवर पाहायला मिळेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *