‘कोवॅक्सिन’ घेणाऱ्यांना लवकरच परदेश प्रवासाची मंजुरी मिळण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ सप्टेंबर । ‘भारत बायोटेक’ निर्मित ‘कोवॅक्सिन’ या करोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून लवकरच परवानगी मिळण्याची शक्यता आहे. भारतात वापरली जाणारी ही करोनाविरोधी लस इतर देशांतही वापरासाठी सुरक्षित घोषित करण्यात आल्यानंतर ही लस घेणारे नागरिक इतर देशांचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना करू शकतील.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ‘कोवॅक्सिन’ला डब्ल्यूएचओची परवानगी मिळू शकते. त्यामुळे ही लस घेणारे भारतीय विद्यार्थी आणि प्रवाशांना परदेश प्रवासाची परवानगी मिळू शकणार आहे.’नॅशनल एक्सपर्ट कमिटी ऑन वॅक्सीन अॅडमिनिस्ट्रेशन’चे अध्यक्ष व्ही के पॉल यांनी, भारत बायोटेकच्या लसीची जुलै महिन्यापासून तज्ज्ञांद्वारे समीक्षा केली जात असल्याचं म्हटलंय.

वृत्तसंस्था एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, डेटा शेअरिंग, डेटा इव्हॅल्युएशनची अनेक स्तरावर समीक्षा करण्यात आलीय. निर्णयाच्या अगदी जवळ पोहचल्याची आम्हाला खात्री आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत एखादा सकारात्मक निर्णय येऊ शकतो, असं पॉल यांनी म्हटलंय.

विज्ञानाच्या आधारावर आपला निर्णय घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेला वेळ द्यायला हवाय. लवकरच हा निर्णय घेतला जाईल अशी आम्हाला आशा आहे. कोवॅक्सिन लस घेणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी काही अनिवार्यता आहेत, त्यासाठी आरोग्य संघटनेची परवानगी आवश्यक आहे, असं पॉल यांनी स्पष्ट केलंय.

९ जुलै रोजी भारत बायोटेककडून प्री-क्वॉलिफिकेशनसाठी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती याअगोदर आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी संसदेत दिली होती.जागतिक आरोग्य संघटनेकडून याअगोदर फायझर – बायोएनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, चीनची सायनोफार्म आणि ऑक्सफर्ड – एस्ट्रेजेनेकाद्वारे निर्मित लसींना आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *