यंदा अनंत चतुर्दशीला ‘या’ मुहूर्तावर पूजा करणं ठरेल लाभदायी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ सप्टेंबर । सर्वत्र नुकतंच गौरी-गणपतींचं विसर्जन झालं आहे. आता सात दिवसांच्या आणि त्यानंतर दहा दिवसांच्या गणपतींचं अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi) विसर्जन केलं जाईल. कोरोनामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मर्यादित स्वरूपातच केला जात असल्यानं अनंत चतुर्दशीला मिरवणूकींची धामधूम नसेल.

हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला म्हणजेच अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं जातं. यंदा 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. यंदाची अनंत चतुर्दशी विशेष आहे. कारण या दिवशी मंगळ (Mars), बुध (Mercury) आणि सूर्य (Sun) कन्या राशीत एकत्र येत असल्यानं दुर्मीळ मंगळ बुधादित्य योग जुळून आला आहे. त्यामुळं यंदा अनंत चतुर्दशीचं महत्त्व आणखी वाढलं आहे.

अनंत चतुर्दशी हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असून, या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानं चांगलं फळ मिळतं. भक्तांचे अनंत अडथळे दूर होतात. त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. कुटुंबात सुख, शांती आणि सौहार्द येते, अशी श्रद्धा आहे.

देशभरात अनेक ठिकाणी या दिवशी भक्त उपवास (Fast) करून भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा करतात आणि त्याला धागे म्हणजेच अनंतसूत्र बांधतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूला अनंत धागे बांधल्यानं सर्व अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे. कापड (Cloth) किंवा रेशमाचा (Silk) वापर करून हे वस्त्र बनवलं जातं. त्याला 14 गाठी मारलेल्या असतात. यंदा अनंत चतुर्दशीच्या पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 6 वाजून 7 मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 5.30 पर्यंत असेल. अनंत चतुर्दशीच्या पूजेसाठी एकूण 23 तास 22 मिनिटांचा शुभ कालावधी उपलब्ध असेल.

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणरायाचं विसर्जन (Ganesh Visarjan) करण्यापूर्वी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. आरत्यांच्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातो. दहा दिवस आपल्या घरी मुक्कामाला असणारा बाप्पा आनंद, समाधान, उत्साह यांची पखरण करून परत आपल्या घरी निघालेला असतो. त्याला निरोप देताना सर्वांनाच हुरहूर लागलेली असते. पुढच्या वर्षी परत येण्याची प्रार्थना करून जड अंतःकरणानं बाप्पाला निरोप दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *