माय मराठी, आता तू चिंता करू नकोस!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 -मुंबई
‘अध्यक्ष महोदय, पहिलीपासून दहावीपर्यंत शाळाशाळांमध्ये मराठी ‘अनिर्वाय’ करण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे, असे राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात ठामपणे सांगितले, तेव्हा ‘अनिर्वाय’ या उच्चाराने कदाचित तू काहीशी गोंधळलीदेखील असशील. पण मराठी मातीत वेगवेगळ्या ढंगाने जागोजागी वावरणाऱ्या तुला अशा उच्चाराचे काही विशेष वाटलेच नसेल.. कारण, ‘अनिवार्य’ या शब्दाचा उच्चार करताना, एक ‘रफार’ अलीकडे आला असला, तरी त्यामागील भावनांचा प्रामाणिकपणा तुला अधिक भावला असेल, असेच आम्ही मानतो. हे मराठी, तुला आम्ही ‘माय’ म्हणून संबोधतो, तेव्हा या शब्दाकडे कोणत्या भाषेतून पाहावयाचे या विचारानेही तू अनेकदा गोंधळून जातेस हे आम्ही अनुभवले आहे. पण त्या शब्दाकडे कसेही पाहिलेस, तरी त्यामागील ‘आपलेपणा’ची भावना तुला नक्कीच भावत असेल. म्हणूनच, तुझ्या शब्दसौष्ठवात विदेशी शब्दांची पखरण करून तुला अधिकाधिक देखणी करण्याच्या आमच्या प्रयत्नांना तू प्रतिसाद दिलास, तर त्यात तुझ्याच भविष्याचे भले आहे, हे तू लक्षात घ्यावेस. कोणे एके काळी, ‘भाषाशुद्धी’चा जागर या मातीत केला गेला. आता ते कालबाह्य़ झाले आहे. जोपर्यंत क्रियापदाच्या जागेवरून तुझ्या अस्सल शब्दांना हटविले जात नाही, तोवर तू अमरच राहणार आहेस. लिखित किंवा मौखिक वाक्यांत कितीही अन्य भाषिक शब्दांनी घुसखोरी केली, तरी तुझे मराठीपण शाबूत ठेवण्याची क्षमता क्रियापदांच्या जागी आहे.. माय मराठी, तू चिंता करू नकोस! फेक तो कटोरा आणि मंत्रालयाच्या दारी, जुन्याच जोमाने, ताटकळत, दिमाखात उभी रहा.. तसे केलेस, तर, तुझे भविष्य तुझ्याच हाती आहे! राज्य सरकारने मराठी अस्मितेचा जो काही सन्मान केला आहे. त्यामुळे आगामी काळात मायमराठी जगभर आपला मराठीबाणा तेवत ठेवण्यात यशस्वी होईल. हे मात्र नक्की… महाराष्ट्र 24 च्या वाचकांसाठी माय मराठीची बोलू कौतुके…

हे माय मराठी, तुझी जागतिक प्रकृती कमालीची सुधारली असून आता तुझ्या सौष्ठवात नवनव्या शब्दांची भर पडली आहे, हे तुलाही मान्य करावे लागेल. डोक्यावर भरजरी मुकुट आणि अंगावर लक्तरे लेवून मंत्रालयाच्या दारी हाती कटोरा घेऊन उभी राहिलेल्या तुला पाहून तीन दशकांपूर्वी कुसुमाग्रजांचे मन कळवळले, म्हणून तुला राजदरबारी मानाचे स्थान मिळवून देण्याच्या हालचाली तरी सुरू झाल्या होत्या. आजही त्या हालचालींत जराही खंड पडलेला नाही, हे त्याच जागी आजही उभी असल्यामुळे तुलाही दिसतच असेल. भाषा स्वत:हून मरत नाही. पण मारली जात असेल, तर तिला कोणीच वाचवू शकत नाही असे म्हणतात. त्यामुळे, तू ‘अमर’ आहेस, ‘मरणप्राय’ आहेस, की ‘मारली’ जात आहेस हे ओळखणे आज तरी अवघडच आहे. कारण जागतिक रूप प्राप्त व्हावे असे शब्दसौष्ठव तुला प्राप्त होऊ लागले आहे.

खरे म्हणजे, भाषा हे तर भावना पोहोचविण्याचे माध्यम असते. भावना पोहोचणे महत्त्वाचे! त्यासाठी उच्चारांची अचूकता आवश्यक असते असे नाही. म्हणून, भाषेचे अलंकार असे जे शब्द, ते उच्चारताना त्यांच्या काना-मात्रा इकडेतिकडे होऊनही त्यामागची भावना पोहोचली, की भाषेचे सार्थक होते. असा व्यापक विचार केला, तर भावनांच्या आविष्काराचे तुझे सामर्थ्य किंचितही कमी झालेले नाही. म्हणूनच तुझ्या भविष्याची काळजी करण्याची कोणासच कधीच गरज भासलेली नाही. तरीदेखील शाळाशाळांमध्ये तुझ्या अनिवार्यतेसाठी जेव्हा ठाम निर्धारांचा जागर केला जातो, ते ऐकून मंत्रालयासमोर ताटकळतानाही तुझे कान कमालीचे तृप्त होत असतील. तुझ्या जतनाच्या आणि संवर्धनाच्या चिंतेचे सूर विधिमंडळाच्या सभागृहात उमटले तेदेखील तू बुधवारी ऐकलेच असशील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *