महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० सप्टेंबर । मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभव पत्करावा लागला होता. पण आता कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित खेळणार की नाही, याबाबत संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी अपडेट्स दिले आहेत.
जयवर्धने यांनी रोहितच्या खेळण्याबाबत सांगितले की, ” इंग्लंडमधून कसोटी मालिका संपल्यावर रोहित शर्मा हा युएईमध्ये आयपीएल खेळण्यासाठी दाखल झाला. मुंबई इंडियन्स संघात दाखल झाल्यावर रोहित हा चांगला सरव करत आहे. रोहितने नेट्समध्ये चांगली फलंदाजी केली आहे, त्याचबरोबर त्याने धावण्याचा चांगला सरावही केला आहे. त्यामुळे रोहितबाबत कोणतीही अफवा पसरू नये, असे आम्हाला वाटते. माझ्यामते रोहितला आयपीएल खेळण्यासाठी थोडा वेळ हवा होता. पण आता कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तो खेळू शकतो, असे आम्हाला वाटत आहे.”