आता आणखी एक E-Bike लॉन्च, किंमत पेट्रोल बाईकपेक्षाही कमी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ सप्टेंबर । इंधनाचे वाढते दर आणि वाढतं प्रदूषण यावर उपाय म्हणून सध्या ई-बाइकचा (E-bike) पर्याय उपलब्ध होत आहे. ही वाहनं विजेवर चालणारी असल्यानं इंधनाचा खर्च आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार आहे. ओला (Ola) मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता डिटेल (Detel) या भारतीय कंपनीनं ई-बाइक लॉन्च केली आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ई-बाइकची किंमत कोणत्याही पेट्रोल बाइकच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही ई-बाइक देशभरात उपलब्ध असेल, अशी घोषणा कंपनीने केली आहे. यासाठी ग्राहकांना डिटेल इंडिया कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करावं लागेल. कोणताही ग्राहक केवळ 1999 रुपयांत ‘डिटेल ईव्ही इझी प्लस’ ही बाइक बुक करू शकतो.

 

डिटेल इंडियानं (Detel India) दिलेल्या माहितीनुसार, ईव्ही इझी प्लसची (EV Easy Plus) किंमत 39,999 रुपये असेल. जीएसटीसह (GST) या बाइकची एकूण किंमत 41,999 रुपये असेल. याचाच अर्थ बुकिंगची रक्कम भरल्यानंतर डिलिव्हरी घेतेवेळी तुम्हाला 40,000 रुपये भरावे लागणार आहेत. ग्राहकांना ही रक्कम डिलिव्हरीच्या 7 दिवस अगोदर द्यावी लागणार आहे, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. हरियाणात गुरुग्राम इथल्या या ईव्ही उत्पादकाने हरियाणा, दिल्ली आणि पश्चिम यूपीमध्ये पार्टनर्सचं नेटवर्क उभारलं आहे.

डिटेलच्या ई-बाइकची वैशिष्ट्यं

ईव्ही इझी प्लस सिल्व्हर ग्रे आणि मेटॅलिक रेड या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. ईव्ही इझी प्लस सिंगल चार्जिंगमध्ये 60 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकेल. या बाइकचा टॉप स्पीड (Top Speed) 25 किलोमीटर प्रतितास आहे. यात चालकाच्या सीटखाली 20 Ahची बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी कोणत्याही 5 अॅम्पिअरच्या स्लॉटद्वारे चार्ज होऊ शकते. या बाइकच्या दोन्ही चाकांना ड्रम ब्रेक (Drum Break) बसवण्यात आले असून, बाइकचा ग्राउंड क्लिअरन्स 170mm आहे.

ईएमआयची सुविधा?

डिटेल इंडिया कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, इझी प्लसच्या ग्राहकांना रोडसाइड असिस्टन्स, सर्व्हिसेस आणि इन्शुरन्सची सुविधा देण्यात येईल. याशिवाय तुम्ही ही बाइक फायनान्सवर खरेदी करू इच्छित असाल तर ती तुम्हाला सुलभ हप्त्यांवर घरी घेऊन जाता येईल. कंपनीला देशात इलेक्ट्रिक बाइक्सचं प्रमाण वाढवायचं आहे. त्यामुळे या ई-बाइकची किंमत अन्य ई-बाइक्स आणि स्कूटर्सच्या तुलनेत कमी ठेवण्यात आली आहे; मात्र तंत्रज्ञानात कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही, अशी माहिती डिटेल इंडियाचे संस्थापक डॉ. योगेश भाटिया यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *