केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी ; सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रसार वाढण्याचा धोका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । देशातील बहुतेक राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार (Coronavirus Spread) कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणासुदीच्या काळात (Festive Season) पुढील दोन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवीन गाईडलाईन (New Covid 19 Guidelines) जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी म्हटलं, की भारतात अजूनही कोरोना विषाणूची दुसरी लाट (2 nd Wave of Coronavirus) पूर्णपणे संपलेली नाही. काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाचा प्रसार कायम आहे. ते म्हणाले, की ज्या राज्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, तिथेही कोरोना प्रसाराबाबत इशारा दिला गेला आहे.

पुढील दोन महिना सणासुदीचा काळ आहे. अशात केंद्र सरकारनं कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे आणि काही नवे नियम जारी केले आहेत. आरोग्य सचिवांनी म्हटलं, की 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एक नवी एसओपी जारी केली गेली आहे.

आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केल्या जाणाऱ्या क्षेत्रांत जिथे कोरोना संक्रमणाचा दर 5 टक्क्यापेक्षा अधिक आहेत तिथे सार्वजनिक कार्यक्रम टाळावे लागतील. ज्या क्षेत्रांमध्ये हा दर 5 टक्क्यापेक्षा कमी आहे, तिथे कार्यक्रमाआधी परवानगी घेणं गरजेचं असेल.आरोग्य सचिवांनी सांगितलं, की पुढील दोन महिन आठवडाभराता रुग्णसंख्येतील वाढ आणि घट यावर त्या क्षेत्रातील निर्बंध आणि सूट याबाबतचे नियम ठरवले जातील.

यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. लोकांना रुग्णालय आणि ऑक्सिजन बेडसाठी दिवसरात्र भटकावं लागत होतं. बहुतेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावं लागलं होतं. सध्या मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. सोबतच मृत्यूदरही कमी झाला आहे. मात्र, केरळ आणि महाराष्ट्रासहित काही राज्यांमध्ये अजूनही कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. याच कारणामुळे सणासुदीच्या काळात केंद्र सरकार पूर्णपणे खबरदारी घेण्याच्या तयारीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *