महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । १४० किमी प्रतितास वेग, इकोनॉमी क्लास आणि बिझनेस क्लासचे डब्बे, मोफत वायफाय-टीव्ही अशा अनेक सुविधा आणि फायदे असलेली मेट्रो पुण्यासाठी देखील विकत घ्यावी, अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना केली आहे. ही नेमकी मेट्रो आहे तरी कशी आणि ती बिनपैशांची म्हणजे फुकट कशी मिळू शकेल, याचं गणितच नितीन गडकरींनी व्यासपीठावरून बोलताना आपल्या भाषणात सांगितलं आहे. तसेच, नागपूरसाठी आपण या १०० मेट्रो बुक केल्या आहेत, पुण्यासाठीही अशा १०० मेट्रो घ्याव्यात, अशी विनंती देखील त्यांनी अजित पवार यांना केली आहे.
“मी एक नवी मेट्रो शोधलीये, तिची किंमत…”
यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी पुणे आणि नागपूर मेट्रोच्या खर्चाची तुलना केली आहे. ते म्हणाले, “अजितदादा माझी तुम्हाला विनंती आहे. पुण्याच्या मेट्रोची प्रति किलोमीटर किंमत ३८० कोटी आहे. नागपूरच्या मेट्रोची किंमत ३५० कोटी प्रति किमी आहे. पण मी एक नवीन मेट्रो शोधलीये. तिची किंमत १ कोटी प्रति किमी आहे. मी या मेट्रोसाठी फुकटात पुण्यातला कन्सल्टंट बनायला तयार आहे. पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बारामती, लोणावळा.. जेवढे ब्रॉडगेज आहेत, त्यावर ही ८ डब्ब्यांची मेट्रो चालू शकते. याला ४ इकोनॉमी क्लासचे एअर कंडिशन्ड इंटरनॅशनल स्टॅंडर्डचे डबे आहेत. दोन बिझनेस क्लास विमानासारखे डबे आहेत. वायफाय, टीव्ही फुकट आहेत. विमानाप्रमाणेच चहा, नाश्ता मिळेल. याचं तिकीट एसटीच्या तिकीटाप्रमाणे ठेवलं आहे. तासाला पॅसेंजर ३५ किमी जाते, एक्स्प्रेस ६० किमी जाते. पण आमच्या मेट्रोचा स्पीड १४० किमी प्रतितास आहे. म्हणजे चंद्रकांत दादा (चंद्रकांत पाटील) पावणेतीन तासांत पुण्याहून कोल्हापूरला जाता येईल. ही स्टेशनवरच थांबेल. ती स्टेशनवरूनच १०० किमीचा वेग घेते.”