महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर । साक्री तालुक्यातील जामदे येथील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात कीर्तन करताना हृदयविकाराने निधन , हरिनामात दंग होत ‘काय मागू पंढरीनाथा, माझी चिंता तुज सर्व आहे’, या अभंगाचे गायन करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने अचानक खाली बसून एका वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवत औरंगाबाद येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन शेख (महाराज) यांनी शेवटचा श्वास घेतला. साक्री तालुक्यातील जामदे येथील ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहात सोमवारी रात्री घटना घडल्याने वारकरी संप्रदायात शोककळा पसरली.
जामदे येथे गेल्या सात दिवसांपासून ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू आहे. सोमवारी रात्री ९ वाजता औरंगाबाद येथील कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन शेख कीर्तन करीत होते. कीर्तनाचे निरूपण सुरू असतानाच त्यांना जोराची कळ आल्याने ते मंचावर खाली बसले. तेथेच बसलेल्या खोरी येथील भिलाजी बारीक शिंदे या वारकऱ्याच्या मांडीवर आपला देह ठेवला. ते अचानक खाली बसल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आयोजकांनी त्यांना वाहनाने नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील डाॅक्टरांकडे नेले. तेथून नंदुरबार येथे हाॅस्पिटलमध्ये हलवले असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर रुग्णवाहिकेतून त्यांना औरंगाबाद येथे नेण्यात आले.