महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर । जम्मू-कश्मीरच्या उरी प्रांतात 2016सारखा हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट भारतीय लष्कराने उधळला. दहशतवाद्यांच्या घुसखोरीची खबर मिळताच लष्कराने नियंत्रण रेषेजवळ चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला, तर लष्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्याला जिवंत पकडले. आठवडाभरात 7 दहशतवादी ठार केल्यामुळे पाकिस्तानला दणका बसला आहे.
मेजर जनरल वीरेंद्र वत्स यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना या कारवाईची माहिती दिली. लष्करापुढे शरण आलेला 19 वर्षांचा दहशतवादी अली बाबा पात्रा हा पाकिस्तानच्या पंजाबमधील रहिवासी आहे. त्याने लष्कर-ए-तोएबाचा सदस्य असल्याची व मुजफ्फराबादमध्ये प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली आहे. दहशतवादी पाकिस्तानी सैन्याच्या मदतीशिवाय घुसखोरी करू शकत नाहीत. दहशतवाद्यांनी सलामाबाद नाल्यातून घुसखोरी केली होती. उरी हल्ल्यातील दहशतवादी याच मार्गाने घुसले होते.