परत पळवाट ! फाशीच्या 3 दिवस आधी निर्भयाच्या गुन्हेगाराने दाखल केली आणखी एक दया याचिका

Spread the love

महाराष्ट्र २४ – नवी दिल्ली; संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या निर्भया गँगरेप केसमध्ये गुन्हेगारांना फाशी देण्याची तारीख वारंवार पुढे ढकलावी लागत आहे. आता 3 मार्चला चारही दोषींना फासावर लटकवायचं निश्चित झाल्यानंतर पुन्हा एकदा ही तारीख लांबण्याची चिन्हं आहेत. कायद्याच्या पळवाटांचा पुरेपूर वापर करत चार दोषींपैकी एकाने आता आणखी एक दया याचिका  नव्याने दाखल केली आहे. निर्भयाचा एक गुन्हेगार अक्षय कुमार  यानं आता म्हटलं आहे की, पूर्वीच्या याचिकेत सगळं तथ्य नमूद केलेलं नव्हतं. म्हणून नव्याने याचिका दाखल करत आहे.

वास्तविक अक्षयने यापूर्वी 1 फेब्रुवारीला दया याचिका दाखल केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ती 5 फेब्रुवारीला फेटाळून लावली होती. त्यानंतर आता 3 मार्चला फाशी देण्याचं निश्चित झाल्यानंतर 3 दिवस अगोदर पुन्हा त्याने याचिका दाखल केली आहे.

निर्भया प्रकरणातला आणखी एक दोषी पवनकुमार गुप्ता यानेसुद्धा क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. शुक्रवारी त्याने दाखल केलेल्या या याचिकेवर अद्याप सुनावणी होणं बाकी आहे. सोमवारी 5 न्यायाधीशांचं खंडपीठ यावर सुनावणी घेणार आहे. चौघा दोषींपैकी पवन हा क्युरेटिव्ह याचिका करणारा शेवटचा गुन्हेगार आहे. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी त्याची विनंती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *