Weather Alert: वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ; राज्यासाठी पुढील चार दिवस धोक्याचे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । परतीचे वेध लागलेल्या मान्सूनने सोमवारी रात्री पुणे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या एक ते दोन तासांमध्ये पुण्यातील अनेक भाग जलमय झाले होते. पावसाचा हा प्रचंड जोर पाहून अनेकांना धडकी भरली होती. येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या इतर भागांनाही पावसाचा असाच तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या भागांमध्ये हायअलर्ट?
राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (5 ऑक्टोबर) रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर, नाशिक, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना मुसळधार वापसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पार्किंग लॉटमध्ये पाणी शिरुन 300-400 बाईक्सचे नुकसान
पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी परतीचा मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा जोर इतका होता की अवघ्या दोन तासांमध्ये शहरातील अनेक भाग जलमय झाले. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी साचले होते. या परिसरातील तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला अवघ्या काही तासांमध्ये पूर्ण पाण्याखाली गेला. त्यामुळे वाहनतळावर लावण्यात अलेलल्या सुमारे 300 ते 400 दुचाकींचे नुकसान झाल्याचे समजते.

अतिमुसळधार पावसाने पुणेकरांची त्रेधातिरपीट उडाली
पुणे शहरात सोमवारी संध्याकाळी अतिमुसळधार पाऊस झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. पुणे शहरालगतच्या आकाशात 12 ते 15 किमी उंचीचे ढग तयार झाले होते. त्यामुळे काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन वाहतूक खोळंबणे, सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरणं, प्लॅश फ्लडसारख्या घटना होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला होता. पाऊस थांबेपर्यंत घरातच थांबा अशी सूचनाही पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *