![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । कोरोना महामारीच्या काळात देशातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पण आता त्यात काही बदल होत आहेत. खरेदीदार ही पुन्हा घर घेण्यासाठी स्वारस्य दाखवत आहेत. टियर 2 शहरांमध्ये याचा महत्त्वपूर्ण परिणाम झालाय. देशातील टियर 2 शहरांमध्ये गेल्या एका वर्षात किमती 10 ते 25 टक्क्यांनी वाढल्यात. येत्या सहा महिन्यांत यात आणखी 15 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
टियर 2 शहरांनी घरांच्या किमती वाढवण्याच्या बाबतीत देशातील मेट्रो शहरांना खूप मागे सोडले. देशातील टियर 2 शहरांमधील निवासी मालमत्तेच्या किमती गेल्या वर्षाच्या तुलनेत 10-25 टक्क्यांनी वाढल्यात. यामध्ये सर्वाधिक वाढ मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झाली. राज्याची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये 20 ते 25 टक्के मालमत्तांच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली. यासोबतच चंदीगड, रायपूर, जयपूर आणि बंगळुरू येथील घरांच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली.
किमती आणखी वाढणार
रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, वाढत्या किमतींचा हा कालावधी असाच चालू राहण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, देशभरात निवासी मालमत्तांच्या खरेदीत वाढ झाली. मागणी वाढल्याने बांधकामाचा खर्चही वाढत आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे पुढील तीन ते सहा महिन्यांत घरांच्या किमती 5 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या तिमाहीतच देशातील मोठ्या शहरांमधील घरांच्या किमतीत 1 ते 3 टक्के वाढ झाली. जास्त मागणी आणि कमी पुरवठा असलेल्या मालमत्तेच्या किमती आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
मेट्रो शहरांच्या तुलनेत घरांच्या किमतींमध्ये जास्त वाढ
देशातील टियर -2 शहरांमध्ये मेट्रो शहरांच्या तुलनेत घरांच्या किमतींमध्ये जास्त वाढ झाली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एका वर्षाच्या आत वेगवेगळ्या विभागांमध्ये किमती 20-25 टक्क्यांनी वाढल्यात. या व्यतिरिक्त पुढील काही महिन्यांत घरांच्या किमतींमध्ये 10 ते 15 टक्क्यांची आणखी वाढ दिसून येते.