महाराष्ट्र 24 -नवी दिल्ली –
अमेरिकेचे राजदूत झलमय खलिझाद आणि तालिबानचे मुल्लाह अब्दुल गनी बरादर यांनी करारावर स्वाक्षरी केल्यानंतर हस्तांदोलन केलं. अमेरिका आणि तालिबानमध्ये गेल्या 18 वर्षांपासून जो संघर्ष सुरू आहे तो संपवण्यासाठी शांततेचा करार करण्यात आला असून 14 महिन्यात अमेरिकेने सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
या करारामुळे अफगाणिस्तानात शांतता स्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारामुळे 18 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हं आहेत. पुढील 14 महिन्यांत अमेरिका आणि NATO देश अफगाणिस्तानमधून सैन्य परत बोलावणार आहे. तालिबान्यांनी जर करारातील अटी पाळल्या तरच अमेरिका आपलं सैन्य परत घेईल असंही या करारात आहे. कतारमधील दोहा येथे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पाँपिओ आणि तालिबानच्या नेत्यांनी एका समारंभात या स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या कार्यक्रमात कट्टरवाद्यांनी त्यांच्या कारवाया थांबवण्याचं वचन दिलं आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या भागात अल कायदाला कारवाया करू देणार नाही असं या करारात म्हटलं आहे.
2011 मध्ये कतारमध्ये तालिबानी नेत्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आलं होतं. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही चर्चा सुरू होती. ही प्रक्रिया बराच काळ चालली होती. तिथे तालिबानने त्यांचं कार्यालय उघडलं होतं आणि त्याच वर्षी बंद केलं होतं. त्यामुळे चर्चेचे इतर प्रयत्न निष्फळ ठरले होते. डिसेंबर 2018 मध्ये कट्टरवाद्यांनी जाहीर केलं की ते राष्ट्राध्यक्षांना भेटतील आणि शांतता प्रस्थापित करतील मात्र कट्टरवादी इस्लामिस्ट गटांनी अफगाण सरकारशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. त्यांना अमेरिकन सरकारच्या हातचं खेळणं संबोधल्या गेलं.
वॉशिंग्टनच्या मुख्य मध्यस्थांनी गेल्या सप्टेंबरमध्ये घोषणा केली की अमेरिका अफगाणिस्तानातून 5400 सैन्यगट 20 आठवड्यांच्या आत परत बोलावतील. तालिबानी कट्टरवाद्यांबरोबर झालेल्या चर्चेतून या मुद्द्यावर सहमती झाली होती. त्यानंतर चर्चा मृतावस्थेत आहे असं ट्रंप यांनी जाहीर केलं आणि तालिबान्यांनी एका अमेरिकन सैन्याला ठार केलं. मात्र नंतर काही आठवड्यातच दोन्ही पक्षांनी पडद्याआड चर्चा सुरू केली.